तब्बल सात महिन्यांनी कागदपत्रे हाती

By Admin | Updated: November 7, 2015 22:39 IST2015-11-07T21:33:29+5:302015-11-07T22:39:41+5:30

गुहागर तालुका : शृंगारतळी डाकघर कार्यालयाचा भोंगळ कारभार

Hand over documents after seven months | तब्बल सात महिन्यांनी कागदपत्रे हाती

तब्बल सात महिन्यांनी कागदपत्रे हाती

शृंगारतळी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन नोंदणीची कागदपत्रे सात महिन्यानंतर वाहनचालकाच्या ताब्यात मिळाल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील शृंगारतळी डाकघर कार्यालयात घडला आहे. या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यानंतर ही कागदपत्र पोस्टमनने दुसऱ्याच व्यक्तीच्या हाती सोपवल्याचे पुढे आले. त्या व्यक्तीने ही कागदपत्रे आपल्याकडे चक्क सात महिने ठेवली होती. या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एप्रिल महिन्यात रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पाठवलेली वाहन नोंदणीची कागदपत्रे चक्क सात महिन्याने संबंधीत व्यक्तीला मिळाली आहेत, ती ही एका अनोळखी व्यक्तीकडे. या प्रकारावरुन डाकघर कार्यालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शेवटी वाहन मालकालाच स्वत: कागदपत्रे शोधण्यासाठी धावपळ करावी लागली आहे. प्रादेशिक कार्यालयात वाहनांची नोंदणी होऊन सात महिने उलटून कागदपत्रे मिळाली नाही म्हणून त्या व्यक्तीने उपप्रादेशिक विभागात संपर्क साधला. त्यावेळी सहा महिन्यांपूर्वीच स्पीड पोस्टाने पार्सल पाठवल्याची माहिती मिळाली.
शृंगारतळी डाकघरात याबाबत विचारले असता आम्ही पत्र दिलेले आहे असे सांगण्यात आले. मात्र, पत्राची पोचपावती पाहिल्यावर एका अनोळखी व्यक्तीने सही करुन पत्र सोडवून घेतल्याचे दिसले. याबाबत जाब विचारला असता तुम्ही लेखी तक्रार करा, मग आम्ही चौकशी करु की तुमचे पत्र कुठे गेले आहे, असे सांगण्यात आले. चौकशीत आमची चूक असली तरी आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. या प्रकाराला पोस्टमनच कारणीभूत आहे कारण पत्र वाटण्याची जवाबदारी पोस्टमनची आहे, असे म्हणत येथील अधिकाऱ्याने यातून अंग काढले. सही करणाऱ्याचा शोध घेतल्यानंतर त्या व्यक्तीने सात महिने पार्सल संबंधिताला न देता स्वत:जवळ ठेवले होते. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीवर्ग जवाबदारी झटकत असतील तर लोकांची कागदपत्रे ही आता रामभरोसेच सोडावी लागणार आहेत. मात्र, याठिकाणी काम करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे डाक खात्याला याचा फटका बसणार असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
 

कोणाचेही टपाल कोणाच्याही हाती

एखाद्या व्यक्तीच्या नावाने आलेली महत्वाची कागदपत्रं ही त्याच व्यक्तीच्या हाती देणे बंधनकारक आहे. त्यामुळेच अशी कागदपत्रं कुरिअरने न पाठवता विश्वसनीय अशा डाक कार्यालयामार्फत पाठवली जातात. जेणेकरून ती गहाळ न होता त्याच व्यक्तीच्या हाती पडावीत. मात्र, शृंगारतळी परिसरात कोणाचेही टपाल कोणाच्याही हाती दिले जात असल्याचे सदर प्रकारावरुन दिसून येत आहे.

Web Title: Hand over documents after seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.