कोरोनामुळे पितृछत्र हरपलेल्या १६ मुलांना ‘माय राजापूर’चा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:35+5:302021-06-30T04:20:35+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : कोरोनाच्या प्रादुभार्वाने पितृछत्र हरपलेल्या राजापूर तालुक्यातील मुलांपैकी सोळा मुलांना ‘माय राजापूर’ने मदतीचा हात दिला. ...

The hand of 'My Rajapur' to 16 children who lost their patriarchy due to corona | कोरोनामुळे पितृछत्र हरपलेल्या १६ मुलांना ‘माय राजापूर’चा हात

कोरोनामुळे पितृछत्र हरपलेल्या १६ मुलांना ‘माय राजापूर’चा हात

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : कोरोनाच्या प्रादुभार्वाने पितृछत्र हरपलेल्या राजापूर तालुक्यातील मुलांपैकी सोळा मुलांना ‘माय राजापूर’ने मदतीचा हात दिला. तसेच धारतळे कोविड सेंटरलाही वस्तूरूपाने मदत केली.

या सोळा मुलांना महिनाभराचे अन्नधान्य, शालेय साहित्य, रोख रक्कम या स्वरूपात मदत पोहोचवण्यात आली. यासाठी मदत फेरी आखण्यात आल्या. पहिल्या फेरीत उन्हाळे येथील सोडये कुटुंबीयांना व कोंडये येथील कांबळे कुटुंबीयांना मदत करण्यात आली. तर दुसऱ्या फेरीत पेंडखले येथील निनावे, वडदहसोळ येथील पळसमकर, वडवली येथील पांचाळ कुटुंबीयांना मदत दिली गेली. शेवटच्या तिसऱ्या फेरीत भालावलीचे खानविलकर तर बेनगी आडिवरे येथील वारिक कुटुंबीयांना माय राजापूर संस्थेने मदत केली.

माय राजापूरच्या सर्व सदस्यांनी स्वत:कडील रक्कम या कुटुंबीयांच्या मदत निधीत जमा केली. एकूण ८७ हजार रुपये या मदत कार्यासाठी खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यात धारतळे येथील कोविड सेंटरलाही मदत देण्यात आली.

पती आपल्याला सोडून गेला, पदरात तीन तीन मुली आहेत. आता आपले कसे होणार, म्हणून विवंचनेत असलेल्या मातांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी माय राजापूरने मानसशास्त्राच्या प्राध्यापिका दीपा ढेकणे यांची मदत घेतली. यासाठी माय राजापूरच्या सर्व महिला सदस्यांनी पुढाकार घेतला. या हताश झालेल्या मातांना धीर देण्यासाठी त्यांच्याशी सतत संपर्क राखला. यापुढेही अशा अजाण बालकांना मदत करण्याचा मानस माय राजापूर संस्थेचे प्रवर्तक प्रदीप कोळेकर व अध्यक्ष जगदीश पवार यांनी बोलून दाखवला.

मदत कार्यात नरेश दसवंत, प्रकाश परवडी, ऋषिकेश कोळेकर, दत्तप्रसाद सिनकर या सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, सेविका यांची मदत झाली.

----------------------------------

घरी जाऊन समुपदेशन

अकस्मात ओढवलेल्या या प्रसंगातून प्रत्येक कुटुंबाला मानसिक आधार देण्याची गरज आहे. अनेक कुटुंबाची या कोरोनाच्या आघाताने फरपट झाली आहे. घरातील एकमेव कमवत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू पावल्याने कुटुंबाला फार मोठा मानसिक धक्का बसला आहे. या धक्क्यातून त्यांनी सावरावे व आपल्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणावा यासाठी माय राजापूर संस्थेचे सदस्य त्यांच्या घरी जाऊन समुपदेशन करत होते.

Web Title: The hand of 'My Rajapur' to 16 children who lost their patriarchy due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.