पोलीसपाटलाच्या बांधकामावर हातोडा
By Admin | Updated: November 5, 2014 00:08 IST2014-11-04T21:19:07+5:302014-11-05T00:08:23+5:30
वृषाली पाटील : अनधिकृत बांधकाम तोडले

पोलीसपाटलाच्या बांधकामावर हातोडा
चिपळूण : तालुक्यातील तनाली गावी तहसीलदार वृषाली पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी अनधिकृत बांधकामावर हातोडा उगारला. यामध्ये पोलीसपाटीलांसह तिघांची अनधिकृत बांधकामे तोडली. पोलिस पाटलांनीच केलेल्या या अनधिकृत बांधकामाची तनाली परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
तनाळी येथे सरकारी जमिनीत अनधिकृत घरे व बांधकामे केल्याची तक्रार तहसीलदार पाटील यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार तहसीलदार पाटील यांनी पोलीसपाटील मोहन घनश्याम देवरुखकर, शरदचंद्र गजानन वैद्य, अनिल वैद्य यांना अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची सूचना देण्यात आली होती. तरीही या सूचनांचे पालन संबंधितांनी केले नाही. शासकीय जमिनीत हे बेकायदा बांधकाम करण्यात आले होते. तसेच तहसिलदारांनी आदेश देऊनही त्यांनी हे बांधकाम हटवले नाही. अखेर ही बांधकामे प्रशासनातर्फे काढून टाकण्याचा निर्णय तहसीलदार पाटील यांनी घेतला.
तहसीलदार पाटील आपले सहकारी निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत, मंडल अधिकारी संदीप गांगड या सर्कलमधील सर्व तलाठी यांच्यासह घटनास्थळी जाऊन केलेले बांधकाम जमीनदोस्त केले. तहसीलदारांनी सरकारी जागेत बांधलेले अनधिकृत घर तसेच दोघांच्या घराभोवतीचे कुंपण काढून टाकल्याने विशेष म्हणजे पोलिस पाटीलचे बांधकाम असूनही ते तोडल्याने तहसीलदार यांच्या धडक कारवाईचे कौतुक होत आहे. तालुक्यातील अन्य अनधिकृत बांधकामे अशीच काढून टाकावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
धडक कारवाई...
पोलीसपाटलांसह अन्य दोघांच्या बांधकामांवरही केली कारवाई.
तनाळी येथे सरकारी जमिनीत घरे व बांधकामे केल्याची तहसीलदारांकडे झाली होती तक्रार.
नोटीस देऊनही बांधकाम न पाडल्याने तहसीलदारांची कारवाई.