गाळाने भरल्या दीड हजार विहिरी
By Admin | Updated: July 25, 2014 22:17 IST2014-07-25T20:52:25+5:302014-07-25T22:17:49+5:30
टंचाईवर उपाय : केवळ १० टक्के काम पूर्ण

गाळाने भरल्या दीड हजार विहिरी
रत्नागिरी : गाळाने भरलेल्या १०४२ विहिरींतील गाळ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उपसा करण्यात येतात. मात्र, चालू आर्थिक वर्षात या विहिरींची १० टक्केही कामे पूर्ण झालेली नाहीत. विहिरींचा गाळ उपसा झाल्यास जिल्ह्यात उद्भवणारा पाणीटंचाईचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. मग्रारोहयोमुळे ग्रामीण भागात रोजगार मिळणार आहे़ त्यासाठी अंगमेहनतीची कामे करणे आवश्यक आहे़ या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वर्षातून १०० दिवस काम मिळणार असल्याने हजारो कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे़ जिल्ह्यातील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे प्रमाण जास्त असतानाही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ या टंचाईच्या कालावधीत विहिरींचा ग्रामीण भागातील नागरिकांना फायदा होतो़ जिल्ह्यात विहिरींमधील गेली अनेक वर्षे गाळ काढण्यात आलेला नाही़ त्यामुळे या विहिरीतील झरे बंद झाले आहेत़ भविष्यात या विहिरी गाळाने बुजण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे़ त्यासाठी या विहिरीतील गाळ काढणे आवश्यक आहे, जिल्ह्यातील ८४४ ग्रामपंचायतींमधील वाड्यांमध्ये १०४२ विहिरींतील गाळ उपसण्याच्या कामांचे आराखड्यामध्ये नियोजन करण्यात आले आहे. यासाठी मग्रारोहयोच्या आराखड्यामध्ये ४ कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ हा आराखडा मंजूरही करण्यात आला होता.ही कामे येत्या आर्थिक वर्षात सुरु करण्यात येणार होती. या कामामुळे लाखो लोकांच्या हातांना काम मिळणार आहे़ मात्र, या उद्दिष्टांपैकी १० टक्केही काम जिल्ह्यात पूर्ण झालेले नाही.मजुरांची जिल्ह्यात वानवा आहेच. ही कामे सुरु झाल्यास परिणाम चांगले जाणवतील. कारण पाणीटंचाईवर मात करता येणार आहे. त्यासाठी सर्वच कामे मार्गी लागणे आवश्यक आहे. मात्र, मजुरांअभावी ते शक्य नसल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. (शहर वार्ताहर)