पोलिसातील माणसाला त्याने केला सलाम !
By Admin | Updated: November 28, 2014 00:10 IST2014-11-27T22:42:45+5:302014-11-28T00:10:28+5:30
त्यांनी जपली माणूसकी : वर्षापूर्वीची आठवण पोलिसाची संवेदना जागविणारी

पोलिसातील माणसाला त्याने केला सलाम !
सुभाष कदम- चिपळूण -सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा, त्याला सुखाने जगता यावे, यासाठी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता सद्रक्षणाय खलनिग्रहणाय... हे ब्रीद घेऊन अहोरात्र कार्यरत राहणाऱ्या पोलिसांकडे समाज तिरस्काराने पाहतो. पण, पोलीसही माणूस आहे. अडचणीच्या काळात त्याच्यातल्या माणुसकीला पाझर फुटतो आणि तोही मदतीला धावतो. एक वर्षापूर्वी केलेल्या मदतीची जाणीव ठेवून एका अवलियाने वाहतूक पोलिसांचा लोटे वाहतूक मदत केंद्रात येऊन सत्कार केला आणि सर्वच हेलावले...
खाकी वर्दीतला पोलीस पाहिला की, अनेकजण त्याची ‘टर’ उडवतात. पोलीस म्हणजे खाबूगिरी करणारा असा समज समाजात दृढ आहे. पण, पोलीस हा सतत कार्यरत राहून आपल्या सुखदु:खाचा विचार न करता समाजाला सहकार्य करीत असतो. स्वत: जळून समाजाला प्रकाश देण्यात तो धन्यता मानतो. सणवाराचा किंवा घरातील कोणत्याही सुखदु:खाचा विचार न करता तो आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून काम करीत असतो. धावपळ, दगदग, अनेकवेळा येणारी आव्हाने तो सहज झेलत असतो. तो एक माणूस आहे. त्यालाही अनेक आव्हानांना सामारे जावे लागते, याचे भान समाज ठेवत नाही. पण, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी. समाजात कोणतेही तेढ निर्माण होऊ नये. सर्व गुण्या-गोविंदाने एकत्र नांदावेत, यासाठी पोलीस झटत असतात. दैनंदिन जीवनात अनेक लहान-मोठ्या प्रसंगाना त्यांनाच प्रथम सामोरे जावे लागते. हे वास्तव विसरुन चालणार नाही.
एक वर्षापूर्वी म्हणजे १६ नोव्हेंबर २०१३ रोजी छत्रपती संभाजी राजे सैनिकी स्कूल, जामगे (खेड) येथील लिपीक अजय आप्पा तोडकरी यांचे वडील आप्पा तोडकरी यांचे मुंबईत निधन झाले. रात्रीची वेळ असल्याने तोडकरी मुंबईला जाण्यासाठी दुचाकीने घराच्या बाहेर पडले. एक्सल फाट्यादरम्यान त्याची दुचाकी पंक्चर झाली. जवळच पोलीस वाहतूक मदत केंद्र आहे. असे त्यांना समजल्याने ते लोटे येथील मदत केंद्रावर आले. रात्रीची वेळ होती. वेळही खूप झाला होता. शिवाय वडिलांच्या अंत्यविधीला तत्परतेने पोहोचायला हवे होते. मदत केंद्रावर रात्रपाळीत कार्यरत असणाऱ्या पोलिसांना त्यांनी आपली व्यथा सांगितली. त्या पोलिसांनीही तोडकरी यांना गाडी मिळवून दिली. त्यामुळे ते अंत्ययात्रेला पोहोचू शकले. त्यांनी खेड पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली आणि लोटे पोलीस वाहतूक मदत केंद्र येथे येऊन तेथे उपस्थित असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांना सलाम केला.अशी परतफेड होईल, असे त्यांनी स्वप्नातही पाहिले नव्हते. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी अजय तोडकरी यांना धन्यवाद दिले.