रत्नागिरी : राज्यात गुटखाबंदी होऊन बराच कालावधी झाला. त्याबाबत अत्यंत कडक कायदे करण्यात आले. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात छोट्या टपरीपासून ते मोठ्या दुकानांमधूनही परराज्यातून येणाऱ्या अनेक ब्रॅँडच्या गुटख्याची खुलेआम विक्री होत असून, अन्न व औषध प्रशासनाने याबाबत डोळ्यावर हात घेतल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्यातील फडणवीस सरकारने गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून गुटखा विक्री वा साठेबाजीत सहभागी असणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. अन्न व प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत त्याबाबत घोषणाही केली.याबाबतचा कायदा इतका कडक होऊनही त्यांची अंमलबजावणी मात्र संबंधित यंत्रणांकडून होताना दिसून येत नाही. त्यामुळे या सर्वच प्रकारात मिलीभगत असल्याचे खुलेआम आरोप जनतेतून होत आहे.गुटखाबंदी प्रामाणिकपणे व्हावी, असे जनतेला वाटते. शासनानेही त्यासाठी कायदा बनवला. परंतु, या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच ढिलाई दाखवली जात असल्याने कायदा कडक असूनही राज्यातील अन्य भागांप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे. त्याबाबत पोलीस, अन्न व औषध प्रशासन यांनी डोळ्यावर हात ठेवल्याचा आरोपही होत आहे. राज्यातील गुटखा उत्पादन सरकारने बंद केले. परंतु गोवा, कर्नाटक व अन्य राज्यात गुटखा निर्मितीवर बंदी नाही. तेथे उत्पादित गुटखा ट्रकमधून जिल्ह्याच्या विविध भागात येत आहे. रत्नागिरीतही हीच स्थिती आहे.गुटख्याचे काही मोठे स्टॉकिस्ट असल्याचीही चर्चा आहे. याबाबत नुकतीच अन्न व औषध प्रशासनाने एमआयडीसीतील एका गोदामावर टाकलेली धाड हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. शासनाने आदेशाचा चाबूक उगारला की कारवाई करायची, इतरवेळी डोळ्यांवर हात ठेऊन काही घडलेच नाही, असे चित्र निर्माण करायचे, ही स्थिती कधी बदलणार असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)दुकान तपासणीत गुुटखाच सापडला नाही?राज्यात गेल्या वर्षभरात ७२ हजार दुकानांची तपासणी करून ३२ कोटींचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती या खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यात एवढ्या मोेठ्या प्रमाणात दुकानांची तपासणी झाली असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र वर्षभरात अन्न व औषध प्रशासनाने केवळ दीडशेच दुकानांची तपासणी केली. जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होत असताना या तपासणी झालेल्या सर्व दीडशेपैकी एकाही दुकानात एकही गुटख्याचे पाकीट, पाऊच प्रशासनाला सापडला नाही, असा दावा करण्यात आला आहे. सात रूपयांचा गुटखा ५0 रूपयांना विकला जातो. उघडपणे त्याची विक्री होते, मात्र संबंधित खात्यांना त्याची माहिती नसते आणि ते करत असलेल्या तपासणीत तो सापडतही नाही. हीच आश्चर्याची बाब आहे.
जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री
By admin | Updated: March 26, 2015 00:08 IST