प्रभाग तेरामधून गुरववाडी नाव गायब
By Admin | Updated: December 5, 2014 23:35 IST2014-12-05T21:43:13+5:302014-12-05T23:35:38+5:30
लांजा नगरपंचायत : प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा

प्रभाग तेरामधून गुरववाडी नाव गायब
लांजा : नव्याने निर्माण झालेल्या लांजा नगरपंचायतीच्या प्रभाग रचना क्रमांक १३मध्ये गुरववाडी आहे. मात्र, गुरववाडीचे नाव या प्रभागातून गायब झाल्याने येथील ग्रगामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
लांजा गावच्या स्थापनेपासून आजपर्यंत लांजा गावाच्या नकाशामध्ये ७/१२मध्ये म्हणजे शासनाच्या महसूल खात्यामध्ये ‘गुरववाडी’ अशी नोंद होती व आहे. मात्र, नव्याने निर्माण झालेल्या लांजा नगरपंचायतीचा प्रभाग रचना क्र. १३मध्ये गुरववाडीचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे तशी हरकत घेऊन गुरववाडी असे नाव नमूद करण्यास सूचित करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
महसूल प्रशासनाच्या सर्व कागदपत्रांवर तसेच बांधलेल्या घराच्या घरपट्टी दुसऱ्या वाडीच्या नावाने दिली. या वाडीमध्ये नुसत्या गुरव समाजाची ५० ते ५५ घरे आहेत. याशिवाय इतर समाजाचीसुध्दा घरे आहेत. त्यांच्याही घराच्या ७/१२ला गुरववाडी आहे. नळपाणी योजना, रेशनकार्ड, आधारकार्ड, बँक खाती निवडणूक ओळखपत्र, मुलांचे शाळेचे दाखले इत्यादी सर्व कागदपत्रांवर गुरववाडी अशी नोंद आहे. मात्र, घरपट्टीवर दुसऱ्याच वाडीच्या नावाने असल्याने वास्तव्याचा दाखला, पासपोर्ट, जातीचा दाखला काढताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांमध्ये सध्या गोंधळ निर्माण होत आहे.
आता नगरपंचायतीच्या प्रभाग सूचनेमध्ये गुरववाडी गायब झाल्याने येथील ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, सर्व कागदपत्रांवर गुरववाडी अशी नोंद आहे. तीच नोंद नगरपंचायतीच्या कागदपत्रांमध्येही मिळावी व ग्रामस्थांचा संभ्रम दूर करावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हरकतीचा मुद्दा लेखी स्वरुपात देण्यात आला आहे.
तरीही गुरववाडी अशी नोंद नगरपंचायत प्रशासनाने केली नाही, नजीकच्या काळात तर आंदोलनाबरोबरच येत्या नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मारुती गुरव व गजानन गुरव यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिली आहे. (प्रतिनिधी)