गुंड काळसेकरला जन्मठेप
By Admin | Updated: July 14, 2016 00:30 IST2016-07-14T00:28:55+5:302016-07-14T00:30:05+5:30
पोलिसांवरील हल्ला प्रकरण : जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा

गुंड काळसेकरला जन्मठेप
रत्नागिरी : पोलिसाच्या डोक्यात चिरा घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार साहील अजमद काळसेकर (२६, नायशी मुस्लिम मोहल्ला, चिपळूण) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायाधिशांवर चप्पल फेकून मारणे, वाहनचोऱ्या अशा अनेक प्रकरणांमध्ये काळसेकर याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
साहील काळसेकर हा पोलिसांच्या लिस्टवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर चिपळूणसह रत्नागिरी पोलिस स्थानकात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने हल्ला केला. त्या प्रकरणात आता त्याला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
२०१५ मध्ये अनेक गुन्ह्यांसाठी ‘वाँटेड’ असलेला काळसेकर पोलिसांचा हाती लागत नव्हता. त्यामुळे चिपळूण न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले होेते. त्याचदरम्यान तो रत्नागिरीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस नाईक उदय वाजे व पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण बर्गे यांना मिळाली. या माहितीनुसार १२ जुलै २०१५ रोजी प्रवीण बर्गे व उदय वाजे हे मिरजोळे येथील एमआयडीसी रोडवर फिनोलेक्स कॉलेज येथे काळसेकर याला अटक करण्यासाठी गेले. त्यावेळी काळसेकर याने हरकत घेऊन उदय वाजे यांच्या अंगावर चावे घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाजे खाली पडले. त्याचवेळी साहीलने त्यांच्या डोक्यात चिरा घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. वाजे तत्पर असल्यामुळे ते बाजूला सरकले. तो चिरा त्यांच्या पायांवर पडून ते जखमी झाले होते.
रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे तपास अंमलदार पूनम पवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गेल्या वर्षभरापासून हा खटला न्यायालयामध्ये सुरू होता. सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्याचे पुरावे ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी काळसेकर याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. विनय गांधी यांनी काम पाहिले. (वार्ताहर)
अनेक गुन्ह्यांत होता समावेश
सराईत गुन्हेगार असलेल्या साहिल काळसेकर याला भा.दं.वि.क. ३०७ अन्वये जन्मठेप, भा.दं.वि.क. ३३२ अन्वये तीन वर्ष सक्तमजुरी, २५ हजार दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी, भा.दं.वि.क. ३५३ अन्वये दोन वर्ष सक्तमजुरी २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी व भा.दं.वि.क. ५०६(२) पाच वर्षे सक्तमजुरी, ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. या सर्व शिक्षा आरोपीने एकाचवेळी भोगावयाच्या आहेत.