गुंड कालसेकरला पोलीस कोठडी
By Admin | Updated: July 31, 2015 01:31 IST2015-07-31T01:31:06+5:302015-07-31T01:31:06+5:30
७ आॅगस्टपर्यंत कोठडीत रवानगी

गुंड कालसेकरला पोलीस कोठडी
रत्नागिरी : पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कुख्यात गुंड साहिल कालसेकर याची ७ आॅगस्टपर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्बल २८ गुन्हे दाखल असलेला
सराईत गुन्हेगार साहिल कालसेकर याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
दि. १२ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापैकी उदय दत्ताराम वाजे नामक कर्मचाऱ्यावर त्याने प्राणघातक हल्ला केला होता. स्थानिकांच्या मदतीने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले; परंतु त्याची प्रकृती खालावल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. १५ जुलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या हातावर तुरी देत कालसेकरने पलायन केले होते. गेले १४ दिवस तो पोलिसांची नजर चुकवत फिरत होता.
चिपळूण पोलिसांनी कालसेकर याला देवरूख येथून ताब्यात घेत गुरुवारी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०७, ३५३, ३३३, ३३२, ३२४, ३२ आणि ५०६ (ब) प्रमाणे गुन्हे दाखल करून गुरुवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्याची रवानगी ७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीमध्ये केली आहे. (वार्ताहर)