ग्रामपंचायतीची फिरू लागली घंटागाडी
By Admin | Updated: January 9, 2016 00:47 IST2016-01-09T00:06:31+5:302016-01-09T00:47:55+5:30
गुहागर तालुका : घरगुती कचरा गोळा करण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता

ग्रामपंचायतीची फिरू लागली घंटागाडी
शृंगारतळी : गुहागर तालुक्यातील शृृंगारतळी-पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी सुरू केली आहे. या उपक्रमामुळे गावातील महत्त्वाचे चौक आणि मुख्य बाजारपेठ स्वच्छ दिसत आहे. त्यामुळे काही प्रमाणात साथीच्या आजारावर नियंत्रण आल्याचे चित्र जाणवू लागले आहे. आगामी काळात घरगुती कचरा गोळा करण्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष पुरवण्याची आवश्यकता आहे.
गुहागर तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ तळी ही आहे. याठिकाणी व्यापारीवर्ग व लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कचऱ्याचीही कमी नाही. बाजारपेठेतून जाणाऱ्या हंगामी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत होती. याच नदीपात्राच्या जवळ असणाऱ्या विहिरी व कुपनलीकांमधून परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. कचऱ्याची समस्या वाढल्याने त्याच्या नियोजनासाठी स्थानिक प्रशासनाने घंटागाडी सुरू केली आहे. तसेच ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या होत्या. मात्र, मोकाट जनावरे व श्वानांमुळे कुंड्यांमध्ये टाकलेला कचरा बाहेर पडू लागला होता. त्यामुळे बाजारपेठेतील कंचराकुंड्या उचलण्यात आल्या. त्यानंतर दररोज प्रत्येक दुकानासमोर गाडी जाऊन कचरा गोळा करू लागली. यासाठी ग्रामपंचायतीने व्यावसायिकांकडून कर आकारण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाला स्वच्छताप्रिय व्यावसायिकांनी प्रतिसादही दिला आहे. मात्र, काहीजण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कचरा नदीच्या पात्रात टाकताना दिसतात.
यापूर्वी बाजारपेठेतील दोन्ही हंगामी नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साठत असल्याने विहिरी व कुपनलिकांचे पाणी दूषित होत होते. त्यामुळे काविळ, ताप, सर्दी, खोकला, जुलाब यांसारखे आजार बळावत होते. मात्र, वर्षभरापासून घंटागाडी प्रत्येकाच्या दारात जाऊन नियमितपणे कचरा गोळा करत असल्याने लोक आजारी पडण्याची संख्या कमी झाली असल्याचे चित्र जाणवू लागले आहे. याठिकाणी घंटागाडीच्या माध्यमातून दररोज साधारण सहा ते सात टन कचरा शृंगारतळीतून बाहेर फेकला जात आहे. यासाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कचरा अभियान पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी घरगुती कचरा करातून वगळण्याची गरज आहे. घरगुती कचरा करातून वगळल्यास लोक घंटागाडीत कचरा टाकतील. (वार्ताहर)