गुहागर समुद्रात तिघे बुडाले
By Admin | Updated: June 10, 2014 01:27 IST2014-06-10T01:16:49+5:302014-06-10T01:27:09+5:30
दोघांना वाचविले : बेपत्ता युवकाचा शोध सुरू

गुहागर समुद्रात तिघे बुडाले
गुहागर : गुहागर समुद्र किनाऱ्यावर सहलीसाठी आलेल्या रामपूर (ता. चिपळूण) येथील नऊ मित्रांपैकी तिघेजण समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले असून प्रितेश पांडुरंग बोबले (वय २२) हा तरुण बेपत्ता आहे. ही घटना आज, सोमवारी सायंकाळी ५ वा. घडली.
रामपूर (तांबी कातकरवाडी) येथील प्रवीण अनंत बोबले, सचिन चंद्रकांत आदवडे, अमोल अनंत वरपे, विपुल विकास निकम, ऋषिकेश प्रकाश आदवडे, संकेत दिलीप वरपे, मकरंद मनोहर साळवी, सतीश शाहू कातकर, प्रितेश पांडुरंग बोबले हे नऊ तरुण मोटारसायकलवरून दुपारी २.३० वाजता गुहागर येथे सहलीसाठी आले होते. एकाच वाडीत राहणारे हे तरुण सुमारे १८ ते २२ या वयोगटांतील आहेत. सायंकाळी गुहागर समुद्र किनाऱ्यावर जेटीवर मौजमस्ती करत होते. दरम्यान, जोराचा वारा सुटला होता. वाऱ्याबरोबर उसळणाऱ्या लाटा अंगावर झेलण्याच्या नादात प्रितेश पांडुरंग बोबले (२२) याच्यासह आणखीन दोन तरुणांचा जेट्टीवरील शेवाळीवरून पाय घसरून ते समुद्रात पडले. सचिन आदवडे याने उडी घेत दोघांना वाचविले. मात्र, प्रितेश मोठ्या लाटेत अडकून समुद्रात ओढला गेला.
याबाबतची खबर कळताच गुहागर पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत बोटीच्या सहायाने शोधकार्य सुरू होते. (वार्ताहर)