जून महिन्यात गुहागर ‘एलईडी’ने उजळणार

By Admin | Updated: May 25, 2016 00:29 IST2016-05-24T21:54:33+5:302016-05-25T00:29:45+5:30

दोन हायमॅक्स दिवे : कामाचे ३० मे रोजी होणार भूमिपूजन, चौपाटीही प्रकाशणार, पर्यटकांची सोय

Guhagar 'LED' will light up in June | जून महिन्यात गुहागर ‘एलईडी’ने उजळणार

जून महिन्यात गुहागर ‘एलईडी’ने उजळणार

असगोली : गुहागर नगरपंचायतीच्यावतीने गुहागर शहरात ६४ एलईडी, आणि दोन हायमॅक्स दिवे उभारण्यात येणार आहेत. या कामाचा शुभारंभ ३० मे रोजी आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते होणार आहे. गुहागर नाका व समुद्रचौपाटी हायमॅक्स दिव्याने उजळणार आहे.तालुक्याच्या ठिकाणी गुहागर असून, शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढत आहे. अशावेळी पर्यटनाला चालना देण्याबरोबर शहर अतिशय देखणे व प्रकाशमान होण्यासाठी नगरपंचायत एलईडी दिव्यांची उभारणी करणार आहे. यातच शहर नाक्यावर व समुद्रचौपाटीवर वाळूमध्ये हायमॅक्स दिवा उभारून ही दोन्ही ठिकाणे अधिक प्रकाशमान होणार आहेत. गुहागर नाका ते शिवाजी चौक, गुहागर नाका ते श्री व्याघ्रांबरी मंदिर, गुहागर नाका ते जीवन शिक्षण शाळा नं. १पर्यंत एलईडी दिवे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये ९ मीटर उंचीचे ४४ दिवे आणि ३ मीटर उंचीच्या २० दिव्यांसह गुहागर नाक्यावरील हायमॅक्स दिवा १० मीटर उंचीचा उभारण्यात येणार आहे. गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील हायमॅक्स दिवा हा १२ मीटर उंचीचा असणार आहे. सुमारे ६० लाख रुपये खर्च करुन या एलईडी दिव्याबरोबर हायमॅक्स दिव्यांची उभारणी केली जाणार आहे.एका हायमॅक्स दिव्यावर सहा मोठे दिवे बसणार आहेत. समुद्रचौपाटीवर गुहागर नाका ते पोलीस ग्राऊंड यांच्यामध्ये वाळूमध्ये १२ मीटर उंचीचा हायमॅक्स दिवा उभारला जाणार आहे. यामुळे पर्यटकांना रात्री उशिरापर्यंत समुद्रकिनाऱ्याचा आस्वाद घेता येणार आहे.
आमदार भास्कर जाधव यांनी याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करुन दिल्याने हे शक्य झाले आहे. या कामाचा शुभारंभ ३० मे रोजी केला जाणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Guhagar 'LED' will light up in June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.