गुहागर-विजापूर रस्त्याच्या ठेकेदाराकडून मार्गताम्हाणेवासीयांना ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:42+5:302021-05-28T04:23:42+5:30
चिपळूण : गुहागर - विजापूर रस्ता रुंदीकरणातील ठेकेदाराने तालुक्यातील मार्गताम्हाणेवासीयांना दिलेली आश्वासने हवेत विरण्याची शक्यता आहे. सुतारवाडी पुलाजवळ नदीकिनारी ...

गुहागर-विजापूर रस्त्याच्या ठेकेदाराकडून मार्गताम्हाणेवासीयांना ठेंगा
चिपळूण : गुहागर - विजापूर रस्ता रुंदीकरणातील ठेकेदाराने तालुक्यातील मार्गताम्हाणेवासीयांना दिलेली आश्वासने हवेत विरण्याची शक्यता आहे. सुतारवाडी पुलाजवळ नदीकिनारी दोनही बाजूने संरक्षक भिंत बांधणे, पद्मावती नदीच्या किनारी टाकलेला भराव व झाडे काढणे ही कामे दुर्लक्षित करण्यात आली आहेत. पावसाळा जवळ आला तरी ठेकेदाराकडून कोणतेही काम सुरु झालेले नसल्याने मार्गताम्हाणे व उमरोली या दोन्ही गावांना ठेकेदाराने ठेंगा दाखविल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
रस्ता रुंदीकरणात ठेकेदाराने मार्गताम्हाणे खुर्द - उमरोली सीमेवरील नदीवर पूल बांधण्यास सुरुवात केली. यावेळी नदीचा प्रवाह एका बाजूला तर पूल दुसऱ्या बाजूला असे पुलाचे बांधकाम केले. त्यामुळे पावसाळ्यात नदीला येणारे पुराचे पाणी दोन्ही बाजूंच्या वस्त्यांमध्ये व शेतीमध्ये घुसून येथील ग्रामस्थांना धोका निर्माण होणार आहे. ही गोष्ट लक्षात येताच दोन्ही गावातील ग्रामस्थांनी ठेकेदाराला जाब विचारला. यावेळी त्याने चूक मान्य करत नदीच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, पावसाळा जवळ आला तरी अद्याप या कामाला सुरुवात झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तसेच मार्गताम्हाणे खुर्द व मार्गताम्हाणे बुद्रुक सीमेवरील पद्मावती नदीतील पाणी उचलण्यासाठी रस्ता तयार केला. यावेळी मातीचा भराव व नदीकाठची तोडलेली झाडीही नदीकिनारीच तसाच ठेवला. पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येतो. या पुरात मातीचा भराव व झाडी वाहून जाऊन नदीच्या प्रवाहाला मोठा अडथळा निर्माण होणार आहे. ठेकेदाराने अद्याप मातीचा भराव व तोडलेली झाडी उचललेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
मार्गताम्हाणे शाळेजवळील महामार्गाला लागून असलेल्या जोडरस्त्यावर ठेकेदाराने एका रात्रीत मातीचा व खडीचा भराव टाकला. या जोडरस्त्याला दोन्ही बाजूने तीव्र उतार असल्याने दरवर्षी पावसाळ्यात शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पाणी तुंबून तळे बनते. वास्तविक येथे मोरी टाकणे गरजेचे असताना, ठेकेदाराने येथे केवळ माती व खडी टाकून ग्रामस्थांची बोळवण केली आहे. पावसाळ्यात येथे चिखल साचून पुन्हा तळे होणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, वाहनचालक व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. ठेकेदाराने येथे डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.