गिरणी कामगारांच्या रोपट्याची आकाशाला गवसणी
By Admin | Updated: May 6, 2015 00:17 IST2015-05-05T21:58:41+5:302015-05-06T00:17:47+5:30
अनिल गंगर : सरफरे विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन

गिरणी कामगारांच्या रोपट्याची आकाशाला गवसणी
देवरुख : एका सामान्य गिरणी कामगाराने १९६५ साली आपल्या सहकाऱ्यांना घेऊन लावलेले रोपटे आज गगनाला गवसणी घालताना दिसते आहे. बुरंबीसारख्या दुर्गम भागात त्यावेळी दशक्रोशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने निर्माण केलेल्या या विद्यालयाला आज ५० वर्षे पूर्ण होत असल्याचा सार्थ अभिमान वाटत आहे, असे प्रतिपादन सुवर्ण महोत्सवाचे प्रमुख उद्घाटक, अपना बाजार, मुंबईचे अध्यक्ष अनिल गंगर यांनी शुक्रवारी केले.
दादासाहेब सरफरे विद्यालय सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी गंगर बोलत होते. ते म्हणाले की, संस्थेला चांगले दिवस आणण्यामध्ये संस्थाचालकांचा मोठा वाटा आहे. याबरोबरच शिक्षकवर्गाचीही तळमळ महत्त्वाची आहे. याच्याच जोरावर गेल्या सहा वर्षांपासून आज या विद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय सुरु आहे. या साऱ्याचा विचार करता सरफरे विद्यालयाची प्रगती वाखाणण्याजोगी असल्याचे मतही अनिल गंगर यांनी व्यक्त केले.
यावेळी शाखाध्यक्ष राजाराम गर्दे यांनी प्रास्ताविक केले. याबरोबरच उद्योजक संजय भाताडे म्हणाले की, शाळेप्रती काहीतरी करावे, ही भावना प्रत्येक माजी विद्यार्थ्यामध्ये रुजणे गरजेचे आहे आणि अशा सामाजिक बांधिलकीतूनच संस्थांना माजी विद्यार्थ्यांचा मोठा आधार मिळतो आणि संस्थेच्या प्रगतीला मोठा हातभार लागतो. यासाठी प्रत्येक स्थिर झालेल्या माजी विद्यार्थ्याने सामाजिक बांधिलकी जोपासणे गरजेचे असल्याचे मत उद्योजक भाताडे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष सरफरे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, संस्था सदस्य शांताराम भुरवणे, उद्योजक सुनील दळवी, मुख्याध्यापक शंकर लेंडवे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष सरफरे, उपाध्यक्ष अशोक सरफरे, शिक्षण व अर्थ सभापती ऐश्वर्या घोसाळकर, संजय भाताडे, सुनील दळवी, चिटणीस संतोष सरफरे, शाखाध्यक्ष राजाराम गर्दे, संस्था सदस्य चंद्रकांत सनगरे, शांताराम भुरवणे, अनंत लोटणकर, दिनेश जाधव, पंढरीनाथ जाधव, महेश जाधव, महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरणाचे सदस्य अशोक जाधव, निवृत्त मुख्याध्यापक रमेश मुळ्ये, व्ही. एम. जोशी, राजेंद्र पोरे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. व्ही. एम. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ८.३० ते १० या वेळेत बुरंबी जुनी शाळा ते सरफरे विद्यालय, शिवने अशी विविध चित्ररथांची मिरवणूक काढण्यात आली. या चित्ररथ मिरवणुकीमध्ये सोनवडे विद्यालयाने पालखी, अरुधंती पाध्ये इंग्लिश मीडियम हायस्कूलने रॉकेट आणि कल्पना चावला, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासह शास्त्रज्ञ साकारले होते. सरफरे विद्यालयाने ग्रंथदिंडी काढली होती. यामध्ये शिवाजी महाराज आणि मावळे हुबेहुब साकारण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान दुपारी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी २५ विद्यार्थ्यांना दत्तक घेत असल्याचे सांगितले. सुवर्ण महोत्सवातील कबड्डी स्पर्धांकरिता संजय भाताडे यांनी ५० हजार रुपयांची देणगी, तर सिताराम चाचे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चाचे यांनी ५ विद्यार्थ्यांना दत्तक, दोन हजार वह्या आणि रोख रक्कम अशी देणगी दिली. (प्रतिनिधी)
संस्थेला चांगले दिवस आणण्यामध्ये संस्थाचालकांचा मोठा वाटा : गंगर.
सामाजिक बांधिलकीतूनच संस्थांना माजी विद्यार्थ्यांचा मोठा आधार : भाताडे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्ररथांची मिरवणूक.