ग्रामसेविकेवर तीव्र नाराजी
By Admin | Updated: December 29, 2015 00:50 IST2015-12-28T23:34:13+5:302015-12-29T00:50:06+5:30
कोंडिवरे : ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बदलीच्या मागणीचा ठराव

ग्रामसेविकेवर तीव्र नाराजी
आरवली : ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेविकेची बदली करण्यात यावी, असा ठराव कोंडिवरे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत एकमताने संमत करण्यात आला. सरपंच शहनाज कापडी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
या सभेत मागील कामांचा आढावा घेण्यात आला. ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविणे, ग्रामस्थांना आवश्यक दाखले शीघ्रतेने मिळावेत आदीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी उपसरपंच जाकीर शेकासन, ग्रामपंचायत सदस्य मजीद खान, बशीर खतीब, तस्लीम वागळे उपस्थित होेते.
कोंडिवरे येथील ग्रामसेविका गेल्या अनेक महिन्यांपासून कोणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. सदस्यांना विश्वासात न घेता त्यांनी नुकतेच साहित्य वाटप केले. याबाबत सरपंचांसह सदस्यांना साहित्य वाटपाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. ग्रामसभेत ग्रामस्थांना चुकीची माहिती देणे, ग्रामपंचायतीमध्ये आलेल्या ग्रामस्थांजवळ सौजन्याने न वागणे, वेळेवर ग्रामपंचायतीमध्ये हजर नसणे, आठवड्यातून अनेकदा गैरहजर असणे, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात न थांबणे असे प्रकार ग्रामसेविकेकडून घडत आहेत.
संगमेश्वर पंचायत समिती गटविकास अधिकारी सरिता पवार, विस्तार अधिकारी पऱ्हाते यांच्या निदर्शनास या बाबी उपसरपंच जाकीर शेकासन यांनी आणून दिल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविकेला तोंडी समज दिली. मात्र, यानंतरही त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नाही. ग्रामपंचायत सदस्यांनी या ग्रामसेविकेची बदली करण्यात यावी, असा ठराव केला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत ग्रामसेविकेची तुरळ ग्रामपंचायत या मुख्यालयात नेमणूक आहे. त्या ठिकाणीही या ग्रामसेविका मनमानी कारभार करत आहेत. त्यातच त्यांच्याकडे कोंडिवरे ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. या ग्रामसेविकेची बदली करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. (वार्ताहर)
‘पॉवरफूल आशीर्वाद’ : मुख्यालयी अद्याप ग्रामसेविकेची नेमणूक
सध्या तुरळ ग्रामपंचायतीचा कार्यभार अन्य ग्रामसेवकाकडे देण्यात आला आहे, मात्र, तुरळ ग्रामपंचायत मुख्यालयी अद्याप कोंडिवरे ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या ग्रामसेविकेची नेमणूक दाखविण्यात आली आहे. या सगळ्याची चौकशी करण्याची मागणीही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात येणार आहे. या ग्रामसेविकेला तालुका ग्रामसेवक संघटनेतील एका ‘पॉवरफूल’ पदाधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या ‘पॉवरफूल’ पदाधिकाऱ्याच्या दबावामुळेच पंचायत समिती प्रशासनही कोणतीच कार्यवाही करत नसल्याचे दिसत आहे.
कारवाईकडे लक्ष
कोंडिवरे येथील ग्रामसेविकेच्या कामकाजाबाबत विद्यमान उपसरपंच जाकीर शेकासन यांनी तक्रार केली आहे. मात्र, या तक्रारीबाबत अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. ग्रामपंचायतीतील ठरावानंतर कोणती कारवाई होते याकडे आता लक्ष लागले आहे.