धान्य दुकानात खडखडाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2015 23:45 IST2015-09-21T21:47:22+5:302015-09-21T23:45:20+5:30
खेड तालुका : रेशनदुकानांच्या काळाबाजाराकडे दुर्लक्ष

धान्य दुकानात खडखडाट
खेड : तालुक्यातील काही रास्त दराच्या धान्य दुकानांमध्ये अद्यापही काळाबाजार होत आहे. रजिस्टरद्वारे येथील दुकानचालकांकडून योग्य प्रकारे हिशोब दाखवण्यात येत असला तरी प्रत्यक्षात कार्डधारकाला काहीही मिळत नाही. यामुळे रास्त दुकानांची तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र, हे नियम अनेकवेळा अधिकारीही पाळत नसल्याचे पुढे आले आहे. काही दुकानांतून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकानात धान्य आणलेच नाही तर काहींनी धान्य आणले असले तरीही ते ग्राहकांना दिले नसल्याचे वास्तव आता पुढे येत असून, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. ऐन गणेशोत्सवात अनेक धान्य दुकानांवर खडखडाट झाल्याने सामान्य गणेशभक्तांना दुप्पट दराने वस्तू किराणा दुकानातून घ्याव्या लागल्या. त्यामुळे अनेक ग्राहकांनी याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पुरवठा अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर दुकानांची पाहणी करणे आवश्यक होते. मात्र, ही तपासणी झालीच नाही. ऐन गणेशोत्सवाप्रसंगी या दुकानांमधून धान्याचा खडखडाट झाल्याने ग्राहकांना धान्य उपलब्ध होऊ शकले नाही. काहींनी गणपतीच्या आगमनाच्या एक दिवस अगोदरच धान्य दुकान उघडले होते़ अनेकांनी सरकारचे नियम पाळले असले तरीही काही मोजक्या दुकानदारांच्या अरेरावीपणाचा फटका तेथील ग्राहकांना बसत असल्याचे सांगण्यात येत आहे़ या दुकानांची तपासणी गेले काही वर्षे झाली नसल्याचे समजते.
रेशनदुकानदारांकडून कधीही दुकाने उघडणे आणि अवेळी बंद करणे याबरोबरच खराब धान्य बदलून न देणे तसेच उर्मट भाषा वापरणे असे प्रकार वारंवार घडत आहेत़ मात्र, अशा प्रकाराकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून अशा दुकानदारांना वचक बसण्यासाठी आता थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत गाऱ्हाणी मांडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
गणरायही नाही पावले...
गणेशोत्सवात वेळेत धान्य पुरवठा होईल आणि त्याचबरोबर तेल आणि साखरही रेशनदुकानांवर मिळेल, या आशेत सर्वसामान्य भक्तगण होते. प्रत्यक्षात गणेशोत्सवात वेगळेच चित्र दिसले. जे नियमित धान्य मिळत होते, त्याचाही खडखडाट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे नेहमीचे धान्यही रेशनदुकानावर मिळाले नाही. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात भक्तांची पंचाईत झाली.