लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका विविध व्यवसायांना बसला. रंगभूमी हे क्षेत्रही त्यापासून अलिप्त राहिलेले नाही. लॉकडाऊनमुळे विद्यार्थी व गुरूंमध्ये अंतर निर्माण झाले आहे. त्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेत अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. परिणामी, टाळ्यांऐवजी आता लाईक्स्, व्ह्यूव्हज मोजून प्रतिसाद पाहिला जात आहे.
शास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला या कला गुरूंच्या संपर्कात राहूनच आत्मसात केल्या जातात; परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यापासून विद्यार्थी व शिष्यात अंतर निर्माण झाले आहे. लॉकडाऊनमुळे कार्यक्रमांवर बंदी आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष होणारे कार्यक्रमाचे सादरीकरण गतवर्षीपासून बंद आहे. त्यामुळे रत्नागिरीतील कलाकारांनी फेसबुकद्वारे सांस्कृतिक कट्टा मैफल सुरू केली आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील नामवंत कलाकार दररोज काही वेळ आपल्या कलेचे सादरीकरण करीत आहेत. त्यामुळे रसिकही तो कार्यक्रम आवडीने पाहतात. वास्तविक कलाकारांना टाळ्या, शिट्टया यातून प्रतिसाद लाभतो; परंतु ऑनलाईन सादरीकरणातून कलाकारांना व्ह्यूव्हज, लाईक्स किती मिळाले यावरून मूल्यमापन होत आहे.
ऑनलाईन वर्गात केवळ जिल्ह्यातीलच नाही, तर देश-विदेशातील विद्यार्थी जोडले गेले आहेत. ऑनलाईन वर्गाचा फायदा कला शिकण्याची आवड असतानाही वेळेअभावी जमले नव्हते, त्यांनीही कला अवगत केली आहे. वास्तविक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कला सादरीकरणासाठी झाला आहे.
-------------------
गतवर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर ऑनलाईन नृत्याचे वर्ग सुरू केले. यामुळे शहरातच नव्हे, तर जिल्ह्यातील, राज्याच्या विविध जिल्ह्यांसह परदेशातील मुलेसुद्धा नृत्य वर्गासाठी जोडली गेली आहेत. गेले संपूर्ण वर्ष कोरोना संकटाशी सामना सुरू असताना यावर्षी पुन्हा ते संकट आले आहे. मात्र, मुलांमधून ऑनलाईन वर्गासाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे. परदेशातील मुलांसाठी तर विशेष बॅच आयोजित केली जात आहे.
- श्रुती आठल्ये, रास नृत्यालय, रत्नागिरी.