रत्नागिरी : आधीचे एक स्मारक तब्बल ३६ वर्षे रखडलेले असताना छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथे नवीन भव्य स्मारक उभारण्याची घोषणा सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली. कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे जेथे वास्तव्य होते, तेथेच हे स्मारक होण्याची शक्यता आहे.औरंगजेबाकडून अटक होण्याआधी छत्रपती संभाजी महाराज कसबा भागात एका वाड्यात राहत होते. आता या वाड्याचे काहीच अस्तित्व नाही. बाळासाहेब सरदेसाई यांची ती जागा आहे. शंभूराजेंचे स्मारक होणार असेल तर त्यासाठी आपण जागा देण्यास तयार असल्याचे त्यांनी याआधीही स्पष्ट केले आहे. सोमवारी अर्थसंकल्पाचे वाचन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या स्मारकाची घोषणा केली आहे.१९८९ साली मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथील पैसा फंड हायस्कूलशेजारी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले. तेथे एक वास्तूही उभारण्यात आली, मात्र त्यापुढे तेथे काहीही झालेले नाही. गेल्या २० वर्षांत हा विषय पूर्णपणे बाजूला पडल्याने ती इमारतही आता अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारताना ते महामार्गावर न उभारता कसबा येथे महाराजांचे वास्तव्य होते त्या जागेत उभारावे, अशी मागणी पुढे येत आहे. हे स्मारक व्हावे, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे केली होती. आता अधिवेशनातच स्मारकाची घोषणा झाल्याने त्याबाबत लवकरच सकारात्मक हालचाली होतील, अशी अपेक्षा केली जात आहे.स्मारकाची घोषणा, निधीची तरतूद नाहीअधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या केवळ स्मारकाची घोषणा झाली. निधीची घोषणा मात्र झालेली नाही. त्यामुळे किती निधी मिळणार, स्मारक नेमके कोठे होणार, त्यात काय काय ठेवले जाणार, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
१०० खाटांचे रुग्णालयअर्थसंकल्पीय अधिवेशनात रत्नागिरीमध्ये १०० खाटांचे संदर्भीय रुग्णालय उभारण्याची घोषणाही करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते.