सरपंचांच्या खोट्या सहीने ग्रामसेवकाचा अपहार
By Admin | Updated: July 16, 2015 00:27 IST2015-07-16T00:27:01+5:302015-07-16T00:27:01+5:30
केळ्ये ग्रामपंचायतीत ग्रामसेवक रोशन जाधव याने केलेल्या ग्रामनिधीच्या अपहारप्रकरणी या सभेत चर्चा झाली.

सरपंचांच्या खोट्या सहीने ग्रामसेवकाचा अपहार
रत्नागिरी : धनादेशावर सरपंचाच्या नावाच्या खोट्या सह्या करुन ग्रामनिधीच्या खात्यातून ७८ हजार रुपयांचा अपहार करणाऱ्या केळ्ये ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा निषेध करुन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय आज बुधवारी झालेल्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत घेण्यात आला.सभापती प्रकाश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या सभेत आंबा, काजू नुकसानभरपाई मिळण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहणार असल्याचा आरोप करीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पदाधिकारी व सदस्यांनी धारेवर धरले होते. गटविकास अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांची एकत्रित भेट घेऊन नुकसान भरपाईपासून वंचित राहणार असल्याची बाब लक्षात आणून देण्याचा निर्णय घेण्यात आला. जाधव गेल्या सहा महिन्यांपासून केळ्ये ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहे. त्याने सरपंच विद्या विलास दामले यांच्या नावाच्या बनावट सह्या करुन ग्रामनिधीतून ७८ हजार रुपयांचे सहा धनादेश वटवले. ही रक्कम तेरावा वित्त आयोग, ग्रामनिधी आणि पंचायत समिती ग्रामीण योजनेच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि युनियन बँकांमध्ये असलेल्या ग्रामपंचायतीच्या खात्यातून परस्पर काढण्यात आली. ही रक्कम ग्रामसेवक जाधव यांनी पुढील तारखांना धनादेशाद्वारे काढली. अशा प्रकारे रक्कम काढल्याचे मासिक सभेच्या वेळी झालेला खर्च पाहिल्यानंतर सरपंच दामले यांच्या लक्षात आले. त्यानंतर सरपंचांनी सभापती प्रकाश साळवी यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या नावे पत्रव्यवहार करुन ग्रामसेवक जाधव यांच्यावर कारवाईची मागणी केली. सभापती प्रकाश साळवी यांनी ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामसेवक जाधव याच्याकडून अपहाराबाबत पंचांसमक्ष अपहार केल्याचे लेखी लिहून घेतले. सभापतींनी गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. (शहर वार्ताहर)
महिला सरपंचांना संरक्षण मिळण्यासाठी ग्रामसेवकाचा निषेध करुन त्याला कठोर शासन व्हायलाच पाहिजे, अशी भूमिका सभापती साळवी यांनी सभागृहात व्यक्त केली. तसेच यापूर्वी ग्रामसेवक जाधव काम करीत असलेल्या धामणसे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराचीही चौकशी करण्याची सूचना दिली असल्याचे सभापती साळवी यांनी स्पष्ट केले.
ग्रामसेवक जाधव याने खोट्या सह्या करुन केलेल्या ७८ हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी सरपंच दामले यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, याबाबत पोलिसांनी काय कारवाई केली, त्याबाबत स्पष्ट झालेले नाही.
आपली चूक झाली असून, स्वत:साठी रक्कम काढल्याचे ग्रामसेवक जाधव याने सभापतींसमोर लिहून दिले होते. मात्र, लिहून दिल्यानंतर या महाभागाने त्याच दिवशी सायंकाळी पुन्हा सरपंचांची खोटी सही करुन १५ हजार रुपये हडप केल्याचेही उघडकीस आले आहे.
तारीख रक्कम
२० एप्रिल १५रुपये २०,०००
२१ एप्रिल १०,०००
२८ एप्रिल १०,०००
३० एप्रिल ८,०००
१९ जून १५,०००
२९ जून १५,०००