रत्नागिरीत ग्रामसेवकांचा मोर्चा

By Admin | Updated: July 1, 2014 00:14 IST2014-07-01T00:08:18+5:302014-07-01T00:14:05+5:30

मागण्यांसाठी ग्रामसेवक सरसावले

Gramsevak's Front in Ratnagiri | रत्नागिरीत ग्रामसेवकांचा मोर्चा

रत्नागिरीत ग्रामसेवकांचा मोर्चा

रत्नागिरी : आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, वेतनातील त्रुटीची दुरूस्ती झालीच पाहिजे, बदल्यांमध्ये बदल झालाच पाहिजे आदी विविध घोषणा देत जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यात कंत्राटी ग्रामसेवक वगळता जिल्हाभरातील ३६५ ग्रामसेवक सहभागी झाले होते.
ग्रामसेवकांच्या वेतनातील त्रुटीची दुरुस्ती करावी, मूलभूत असलेल्या मागण्यांची पूर्तता करावी आदी विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी यापूर्वी संघटनतर्फे निवेदने, मोर्चा, धरणे आंदोलने करण्यात आली. परंतु, शासनाने त्याकडे दुर्लक्षच केले. मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्याने शासनाला जाग आणण्यासाठी रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक युनियनतर्फे आज (दि. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात
आला.
राज्यस्तरावर करण्यात येणारे हे आंदोलन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. उद्या १ जुलैला कृषीदिन असल्याने उद्या सर्व ग्रामसेवक काम करणार आहेत. कार्यालयीन वेळ संपताच जिल्ह्यातील ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या चाव्या, शिक्के तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्याकडे जमा करणार आहेत. २ व ३ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित धरणे आंदोलनासाठी हे सर्व ग्रामसेवक उद्या मंगळवारी रात्रीच रवाना होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. जी. पाटील यांनी याप्रसंगी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारपर्यंत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे यांनी ते स्वीकारले. संघटनेच्या मागण्या आपण शासनापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष आर. जी. पाटील, सरचिटणीस जे. डी. बडद, उपाध्यक्ष संतोष हुमणे, महिला उपाध्यक्ष अमिता नेरसेकर, सहसचिव एम. डी. नवरे, ए. के. शिंदे, एस. एन. बेंडल, ए. बी. मोहिरे, आर. एम. पाटील, विकास देसाई, जे. टी. जाधव, एस. एस. महाडिक, एन. एस. पवार, एस. आर. सकपाळ, के. डी. पवार, प्रशांत कांबळे, व्ही. आर. पाटील, गणेश क्षीरसागर, एस. एम. चौगुले, एस. एन. दर्डी, मेधा नलावडे आदी संघटनेचे जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Gramsevak's Front in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.