दर्जा टिकवण्यात ग्रामपंचायती अपयशी
By Admin | Updated: November 11, 2014 23:24 IST2014-11-11T21:45:50+5:302014-11-11T23:24:01+5:30
पाचल विभाग : स्वच्छता मोहीम राबतेय फक्त अभियानापुरतीच

दर्जा टिकवण्यात ग्रामपंचायती अपयशी
पाचल : पाचल विभागातील निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती आपला दर्जा टिकविण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ व सुंदर गाव अभिनव कल्पना वापरुन संपूर्ण भारत स्वच्छ ठेवण्याचे अभियान राबवले गेले. ज्या ग्रामपंचायतीने या अभियानात भाग घेऊन आपला गाव स्वच्छ व सुंदर केला, त्या ग्रामपंचायतीना शासनाच्यावतीने निर्मल ग्राम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ग्रामस्वच्छता अभियान राबवताना अटी व शर्ती घालून स्वच्छता अभियानाची नियमावली तयार करण्यात आली होती. यास बांधील राहून ग्रामपंचायत आपल्या परीने कामकाज करत होती. सर्वप्रथम हगणदारी मुक्त गाव व्हावा म्हणून जिथे कुटुंब तिथे शौचालय बांधून त्याचा वापर नियमीत करावा. घर, घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवताना इतरही परिसर स्वच्छ ठेवण्यास ग्रामस्थांना प्रवृत्त करुन गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत होते. गावात असलेले पाणवठे, सार्वजनिक विहिरी तसेच वैयक्तीक विहिरी, जलशुद्धीकरण करुन आरोग्याच्या हितावह पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु हेच सातत्य राखण्यास ग्रामपंचायती अपयशी ठरल्याचे दिसून येते.
राजापूर तालुक्यात आजही हजारो कुटुंब शौचालयाविना असून, तशी दप्तरी नोंद दिसून येते. काही कुटुंब शौचालय असूनसुद्धा उघड्यावर बसलेली दिसतात. हगणदारी मुक्ती करत असताना उघड्यावर शौचाला बसणे कायद्याने गुन्हा ठरविला असून, अशी कोणीही व्यक्ती दिसली तर दंड करुन दाखवणाऱ्यास बक्षीस म्हणून दिली जाते.
आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये कुठेही दंड केलेली व्यक्ती दिसून येत नाही. परंतु शौचाची दुर्गंधी मात्र परिसरात आढळून येते, तर काही ग्रामपंचायतींचे आवारही स्वच्छ दिसत नाहीत. ग्रामस्वच्छता अभियानाचे क्षणिक सुख घेऊन त्याकडे नंतर ग्रामपंचायतीनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे तालुक्यातील संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली असल्याचे पाहायला मिळते आहे. निर्मल ग्रामपुरस्कारासाठी जसे काम झाले तसे काम सतत त्या भागात व्हावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)