पदवीचा बोगसपणा नडणार
By Admin | Updated: June 20, 2014 00:19 IST2014-06-20T00:17:57+5:302014-06-20T00:19:22+5:30
अलाहाबाद विद्यापीठातून प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांना बढती नाही

पदवीचा बोगसपणा नडणार
रहिम दलाल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पदवीधर मुख्याध्यापकांच्या नियुक्त्या करताना अलाहाबाद विद्यापीठातून पदवीधर झालेल्या शिक्षकांना वगळण्यात येणार आहे़ त्यामुळे अनेक पदवीधर शिक्षकांना मुख्याध्यापक पदापासून दूर राहावे लागणार आहे़ सध्या इतर राज्यातील अनेक मुक्त विद्यापीठांच्या शाखा उघडण्यात आल्या आहेत़ त्यातून अनेकजण पदव्या प्रदान करुन शासकीय नोकऱ्यांमध्ये त्याचा वापर सर्रासपणे केला जात आहे़ आता काही दहावी, बारावी झालेले डी़एड़ धारक शिक्षकांनीही या पदव्या मिळविल्या आहेत़ अगदी कमी कालावधीत या पदव्या प्रदान केल्याने ज्यांनी महाविद्यालयांमध्ये खरोखर मेहतन घेऊन पदवी मिळविली आहे, अशांवर शासकीय फायदा घेताना अन्याय होत असल्याची ओरड सुरु आहे़ जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेतही या विषयी जोरदार चर्चा झाली होती़ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व शिक्षण समितीचे सदस्य विकास नलावडे यांनी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत अलाहाबाद विद्यापीठाच्या पदव्या बोगस असल्याचा आरोप केला होता़ त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील शिक्षकांनी अलाहाबाद विद्यापीठाची पदवी मिळवली आहे़ त्या पदव्या प्राप्त केलेल्या पदवीधर शिक्षकांना मुख्याध्यापक पदाचा नियुक्त्या देण्यात येवू नयेत, अशी मागणीही जिल्हाध्यक्ष नलावडे यांनी केली होती़ लवकरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत़ त्यामुळे शिक्षण विभाग सतर्क झाला आहे. या नियुक्यांच्या वेळी अलाहाबाद विद्यापीठाच्या पदवीधर शिक्षकांच्याही मुख्याध्यापकपदी नियुक्त्या होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शिक्षक संघाने त्यापूर्वीच आवाज उठविला आहे़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून अलाहाबाद विद्यापीठातून पदवी घेतलेल्या पदवीधर शिक्षकांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती करताना चाप बसणार आहे़ त्यामुळे बढती मिळवण्यासाठी बोगस पदवी मिळवणाऱ्या शिक्षकांना चांगलाच चाप बसणार आहे. (शहर वार्ताहर)