गोविंदगडावरील रहिवाशांना हवीय सुरक्षितता

By Admin | Updated: June 30, 2015 00:15 IST2015-06-29T23:26:05+5:302015-06-30T00:15:59+5:30

सुरक्षितता हवी : गोवळकोटवरील भेगांनतर भयग्रस्त ग्रामस्थांची हजारे यांच्याशी चर्चा

Govindgad Residents Are Necessary Safety | गोविंदगडावरील रहिवाशांना हवीय सुरक्षितता

गोविंदगडावरील रहिवाशांना हवीय सुरक्षितता

चिपळूण : शहरातील गोवळकोट येथील गोविंदगडावरील जमिनीला भेगा पडल्याने बौद्धवाडी - भोईवाडीसह तीन वाड्यांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) गटातर्फे व रहिवाशांनी आज (सोमवारी) उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांची भेट घेऊन रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष के. डी. कदम, सरचिटणीस नितेश गमरे, कार्याध्यक्ष संदेश कदम, भूपेंद्र पवार, शहराध्यक्ष मंगेश जाधव, तालुका युवक अध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हा युवक अध्यक्ष प्रशांत मोहिते, अमोल कदम, तरुण कदम, उत्तम सकपाळ, राजाराम जाधव, अनंत पवार, दीपक कदम, नाना कांबळे, राजन जाधव, सचिन जाधव, तेजस जाधव, दिलीप मोहिते आदींची उपस्थिती होती.
गेले काही दिवस पडणाऱ्या पावसामुळे गोवळकोट येथील गोविंदगड किल्ला परिसरात भेगा पडल्या आहेत. या भेगा किल्ल्यापासून दक्षिणेकडील बौद्धवाडीपासून ते भोईवाडीपर्यंत अंदाजे अडीच किलोमीटर लांब व बारा फूट रुंदीच्या आहेत. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून, प्रशासकीय पातळीवर कोणत्या स्वरुपाची उपाययोजना करण्यात आली आहे. यावेळी भागातील रहिवाशांना अद्याप कोणतीच माहिती देण्यात आली नाही. २५० घरे धोकादायक स्थितीत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्रामस्थांना उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे पुणे येथील माळीण दुर्घटनेची आठवण येऊन जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत आहे.
गोविंदगडावर जमिनीला गेलेल्या तड्यांमुळे शासनातर्फे रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकारी सर्वेक्षण करुन गेल्यापासून कोणत्याही प्रकारे गांभीर्याने दखल घेतली गेलेली नाही. या भागात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या जीवित व वित्तहानीच्या भविष्यात उद्भवणाऱ्या धोक्यासंदर्भात भूवैज्ञानिक व भूजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार तातडीने उपाययोजना करण्यात यावी.
पावसामुळे भेगा वाढत आहेत. त्यामुळे दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनातर्फे योग्य ती उपाययोजना तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पालकमंत्री, तहसीलदार वृषाली पाटील, नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांना देण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Govindgad Residents Are Necessary Safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.