गोविंदगडावरील भेगांची रुंदी वाढली
By Admin | Updated: June 29, 2015 00:28 IST2015-06-28T22:39:33+5:302015-06-29T00:28:04+5:30
तहसिलदारांकडून पाहणी : गडाला भेट देऊन उपायांवर केली चर्चा..

गोविंदगडावरील भेगांची रुंदी वाढली
चिपळूण : गोवळकोट येथील गोविंदगडाला पडलेल्या भेगा दिवसेंदिवस अधिक रुंदावत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तहसीलदार वृषाली पाटील यांनी आज रविवारी सकाळी या गडाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व येथील नागरिकांशी चर्चा केली. गोविंदगडावर पडलेल्या भेगा दिवसेंदिवस रुंदावत आहेत. या भेगांमुळे गडाच्या पायथ्याशी असलेल्या भोईवाडी, न्हावीवाडी व बौध्दवाडीतील घरांना धोका निर्माण झाला आहे. आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास कोणती उपाययोजना करावी, यासाठी आज सकाळी गोवळकोट येथील भोईराज सभागृहात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. भोई समाजाचे अध्यक्ष मधुकर कासेकर यांनी तिन्ही वाड्यांमधील ग्रामस्थांना एकत्र आणले होते. तहसीलदार वृषाली पाटील यांनी ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच आपल्या घरातील मौल्यवान चीज वस्तू अन्यत्र हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थलांतरण करण्याची वेळ आल्यास भोईराज सभागृह, खतिजा इंग्लिश मीडियम स्कूल व बौध्दवाडीसमोरील गार्डनमध्ये असणाऱ्या निवाराशेडचा ग्रामस्थांनी आश्रय घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले. दिवसेंदिवस या भेगा रुंदावत असल्याने येथील ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. ग्रामस्थ व तहसीलदार यांच्यात विविध शक्यतांवर चर्चा झाली. शासकीय पातळीवर आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन तहसीलदारांनी दिलेआहे. यानंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)