राजकीय दाैऱ्यांसाठी शासकीय यंत्रणा वेठीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST2021-05-23T04:30:30+5:302021-05-23T04:30:30+5:30
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीला ताैक्ते चक्रीवादळाने दणका दिला. यात रत्नागिरी आणि लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अताेनात नुकसान केले आहे. सध्या ...

राजकीय दाैऱ्यांसाठी शासकीय यंत्रणा वेठीला
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीला ताैक्ते चक्रीवादळाने दणका दिला. यात रत्नागिरी आणि लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अताेनात नुकसान केले आहे. सध्या कोरोनाचे संकट गडद असतानाच या चक्रीवादळाचे संकट उभे ठाकल्याने यंत्रणा ते निवारणाचे, त्याचबरोबर पंचनामे, मदत पोहोचविण्यात दिवसरात्र मेहनत घेत असतानाच दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेल्या राजकीय दाैऱ्यांमुळे जेरीस आल्या आहेत.
गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट अधिकच गडद होऊ लागले आहे. त्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे गुरफटली आहे. असं असतानाच पुन्हा गेल्या रविवारी जिल्ह्यात आलेल्या ताैक्ते चक्रीवादळाने पूर्ण जिल्ह्याला तडाखा दिला. कोरोनात व्यग्र असलेल्या महसूल आणि अन्य शासकीय यंत्रणा पुन्हा हे संकट निवारणासाठी धावून गेल्या. स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी तसेच मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने पंचनामे तातडीने सुरू असतानाच दुसऱ्या दिवसांपासून जिल्ह्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेतेमंडळींनी जिल्ह्याच्या दाैऱ्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणांची धावपळ अधिकच वाढली आहे. चक्रीवादळाच्या अनुषंगाने हाती असलेली कामे सोडून या मंडळींच्या दाैऱ्याच्या सर्वतोपरी व्यवस्था करताना शासकीय यंत्रणांना विशेषत: महसूल कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत.
आधीच उन्हातान्हातून चक्रीवादळाचे पंचनामे करताना या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला फेस येत आहे. त्यातच राजकीय मंडळींचे दाैरे वाढू लागल्याने हातातील कामे अर्धवट टाकून दाैऱ्याचे नियोजन करावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्यभरात जमावबंदी आणि संचारबंदी सुरू झाली आहे. मात्र, राजकीय दाैऱ्यांना यामधून वगळण्यात आल्याने दाैऱ्यावेळी राजकीय मंडळींसोबत कार्यकर्त्यांचा लवाजमा असतो. या व्यक्तींबरोबर वावरत असल्याने शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी बाधित होण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. जिल्ह्यात सध्या वाढलेले दाैरे आणि सोशल डिस्टन्सिंगचा उडणारा बाेजवारा पाहता कोरोना प्रादुर्भाव अधिक वाढणार, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे राजकीय लोकांनी दाैरे आवरते घेऊन यंत्रणांना ऑनलाइन मार्गदर्शन करावे, अशा संतप्त प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहेत.