शासनाने निम्मीच रक्कम भरल्याने २४ हजार शेतकऱ्यांचा परतावा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST2021-08-23T04:33:12+5:302021-08-23T04:33:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : फळपीक विमा योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून अद्याप हिश्शाची निम्मीच रक्कम भरण्यात ...

As the government paid only half the amount, the return of 24,000 farmers was delayed | शासनाने निम्मीच रक्कम भरल्याने २४ हजार शेतकऱ्यांचा परतावा रखडला

शासनाने निम्मीच रक्कम भरल्याने २४ हजार शेतकऱ्यांचा परतावा रखडला

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : फळपीक विमा योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून अद्याप हिश्शाची निम्मीच रक्कम भरण्यात आली आहे. उर्वरित रक्कम प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील २४ हजार ६५९ शेतकऱ्यांचा विमा परतावा रखडला आहे. शासनाने पूर्ण रक्कम भरल्याशिवाय शेतकऱ्यांना परतावा मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना परताव्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

उच्चत्तम तापमान, अवेळीचा पाऊस आणि नीच्चांकी तापमान याचा परिणाम आंबा, काजू उत्पादनावर झाला आहे. त्यातच तौक्ते वादळाच्या तडाख्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा जमिनीवर आला. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र शासनाने जाहीर केली. त्यामध्ये अवेळी पावसासाठी दि. १ डिसेंबर ते १५ मे, कमी तापमानासाठी दि.१ जानेवारी दि. १५ मार्च, जास्त तापमानासाठी दि. १ मार्च ते दि. १५ मे आणि गारपीटसाठी दि. १ फेब्रुवारी ते दि. ३१ मे हा कालावधी जाहीर करण्यात आला. आंबा पिकासाठी विमा कालावधी डिसेंबर ते दि. १५ मेपर्यंत होता.

विमा निकषांमध्ये काजूसाठी अवेळी पावसाचा कालावधी दि. १ डिसेंबर ते दि. ३१ मार्च ग्राह्य धरला होता. या याेजनेंतर्गत जिल्ह्यातील ३,२९३ बागायतदारांनी काजू क्षेत्रावरील विमा उतरवला आहे. विमा कालावधी संपून तीन महिने झाले आहेत. मात्र, अद्यापही विमा परताव्याची रक्कम बागायतदारांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही.

जिल्ह्यातील २१,३६६ आंबा, तर ३,२९३ काजू उत्पादक शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला आहे. १४,९३७ हेक्टर क्षेत्रासाठी विमा उतरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी प्रीमियमसाठी ९ कोटी ९४ लाख ६९ हजार ९६३ रूपयांची रक्कम भरली आहे. मात्र, राज्य शासनाकडून ४५ कोटी ९ लाख २७ हजार ३८१ तर केंद्र शासनाकडून २४ कोटी ३४ लाख २९ हजार २३९ रूपयांचा हप्ता असताना, हप्त्याची निम्मीच रक्कम प्राप्त झाली असली तरी निम्मी रक्कम प्राप्त होणे गरजेचे असल्याने परतावा प्राप्त होण्यास विलंब होत आहे.

---------------------------

२०१९पर्यंत फळपीक विमा योजनेसाठी हेक्टरची मर्यादा नव्हती. मात्र, २०२०पासून चार हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा योजनेसाठी निकष जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे चार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ४६ असल्याने विमा कंपनीने संबंधित शेतकऱ्यांकडून ‘ना हरकत दाखला’ मागवला होता. मात्र, ४४ शेतकऱ्यांनी दाखला दिला असला तरी दोन शेतकऱ्यांनी मात्र तो देण्यास नकार दर्शविला आहे.

-----------------------------

विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून ४५ दिवसांत शेतकऱ्यांना विमा परताव्याची रक्कम प्राप्त होणे गरजेचे होते. मात्र, तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही परतावा जाहीर केलेला नाही. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी असताना तसेच नैसर्गिक संकटामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून संपूर्ण रक्कम भरली गेली असताना शासनाकडून मात्र हप्त्याची रक्कम भरण्यास दिरंगाई होत असल्याने शेतकरी परताव्यापासून वंचित राहिले आहेत.

- राजन कदम, आंबा बागायतदार

---------------------------

शेतकरी २४,६५९

विमा संरक्षित क्षेत्र १४,९३७ हेक्टर

विमा संरक्षित रक्कम १९८ कोटी ९३ लाख ९९ हजार २७३ रुपये

एकूण प्रीमियम ७९ कोटी ३८ लाख २६ हजार ५८४ रुपये

शेतकऱ्यांनी भरलेला प्रीमियम ९ कोटी ९४ लाख ९९ हजार ६३ रुपये

राज्य शासनाचा हप्ता ४५ कोटी ९ लाख २७ हजार ३८१ रुपये

केंद्र शासनाचा हप्ता २४ कोटी ३४ लाख २९ हजार २३९ रुपये

Web Title: As the government paid only half the amount, the return of 24,000 farmers was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.