देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील अवघड वळणावर पुन्हा त्याच ठिकाणी आज, गुरुवारी सकाळी १० वाजता ट्रक उलटल्याची घटना घडली. गुगल मॅपद्वारे गोव्याहून वसईकडे फुणगुस मार्गे हा ट्रक चालला होता. मात्र, फुणगुस येथील अवघड वळणाचा चालकाला अंदाज आला नाही आणि गाडी उलटली. सुदैवाने चालकाने गाडीतून उडी मारल्यामुळे जीवितहानी टळली.दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी केमिकल टँकरचा अपघात झाला होता. १५ दिवसातील हा तिसरा अपघात आहे.पार्लेजी पेपर रॅपिंग रोल घेऊन ट्रक (एमएच ४८, जीबी २९३०) घेऊन गोव्याहून वसईकडे गुगल मॅपद्वारे चालला होता. यामध्ये ७ टन माल होता. फुणगुस मार्गे जात असताना एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक थेट ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळला. यावेळी चालकाने गाडीतून उडी मारल्याने ताे बचावला.अपघाताच्या मोठ्या आवाजाने ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत मदत केली. चालकाला दरीतून वरती आणत पाणी दिले. अपघातस्थळी ग्रामस्थ किरण भोसले, साहीम खान, प्रशांत थुळ, सुभाष लांजेकर, जमीर नाईक यांनी यावेळी मदत केली.दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी ट्रक उलटल्याची घटना घडली होती. या अपघाताची माहिती पोलिस पाटील यांनी संगमेश्वर पोलिस स्थानकाला देताच पोलिस घटनास्थळी रवाना झाले.
Ratnagiri: गुगल मॅपने पुन्हा केला ट्रकचालकाचा घात, फुणगुस येथे ट्रक दरीत कोसळला; १५ दिवसात तिसरा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:05 IST