जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी गोलमडे

By Admin | Updated: February 24, 2016 00:01 IST2016-02-24T00:01:47+5:302016-02-24T00:01:47+5:30

बिनविरोध निवड

Golmade was elected president of Zilla Parishad | जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी गोलमडे

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी गोलमडे

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे तुकाराम तथा बुवा गोलमडे यांची आज (मंगळवार) दुपारी ३ वाजता बिनविरोध निवड झाली. या पदासाठी शिवसेनेकडून आधीच त्यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अन्य कोणीही उमेदवार नसल्याने गोलमडे बिनविरोध विजयी झाले. त्यांच्या निवडीने चिपळूणला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान प्रथमच मिळाला आहे.
सेना नेत्यांच्या आदेशानुसार जगदीश राजापकर यांनी २७ जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असलल्या सतीश शेवडे यांच्याकडे १ फेबु्रवारीपासून अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. या पदासाठी चिपळूणला मान मिळावा, अशी मागणी होती. त्यामुळे गोलमडे यांचे नाव आघाडीवर होते. त्यांना मातोश्रीवरूनही हिरवा कंदील मिळाल्यानंतर आज गोलमडे बिनविरोध विजयी झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आज सकाळी ११ ते दुपारी १ वाजता या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ होती. यामध्ये फक्त गोलमडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. भाजप, राष्ट्रवादी व कॉँग्रेस यांनी स्वतंत्र उमेदवार उभा न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे दुपारी ३ वाजता गोलमडे बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात गोलमडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यावेळी बाळासाहेब व उध्दव ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. सेनेच्या सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. या निवडीच्यावेळी चिपळुणचे आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम तसेच सेनेचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Golmade was elected president of Zilla Parishad