देवरुख : गाडीला धडक देऊन नुकसानभरपाई मागण्याचा बहाणा करून सराफी दुकानमालकाचे अपहरण करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी रात्री देवरुख साखरपा मार्गावर घडला. त्यांच्याकडील १४ लाख रुपयांच्या सोन्याच्या चेन आणि २० हजार रुपये लुटून चोरट्यांनी त्यांना मुंबई गोवा महामार्गावर वाटुळ (ता. राजापूर) येथे सोडून दिले आणि चोरटे पळून गेले. देवरुखच्या सह्याद्रीनगर येथील केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय केतकर यांच्याबाबत हा प्रकार घडला असून, पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास सुरू केला आहे.धनंजय केतकर बुधवारी साखरपा येथील संदेश ऊर्फ बापू शेट्ये यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला गेले होते. तेथून घरी जेवायला येत असल्याचे केतकर यांनी सांगितले आणि ते देवरुखकडे निघाले. रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ते वांझोळे येथे आले असता मागून आलेल्या इर्टिगा गाडीने त्यांच्या बीएमडब्ल्यू गाडीला धक्का दिला. त्या गाडीतील एकजण खाली उतरून त्यांच्याकडे नुकसानभरपाई मागू लागला. त्याने केतकर यांना खाली उतरून गाडीचे नुकसान पाहण्याची सूचना केली. त्याच वेळी इर्टिगा गाडीतून अन्य चारजण खाली उतरले. त्यांनी केतकर यांच्या चेहऱ्यावर काळा बुरखा टाकला आणि त्यांना इर्टिगामध्ये कोंबण्यात आले.गाडी देवरुखच्या दिशेने जात असल्याचा अंदाज केतकर यांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे. गाडीतील तरुणांनी त्यांच्या डोक्याला काहीतरी वस्तू लावून पैशांची मागणी करत १४ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चेन आणि रोख २० हजार रुपये काढून घेतले. इर्टिगामधील एकाने अज्ञाताला फोन करून ‘आम्ही एकाला ताब्यात घेतले आहे, तुम्ही या,’ असे सांगितले. त्यानंतर केतकर यांना दुसऱ्या गाडीत बसवण्यात आले. दुसऱ्या गाडीतील तरुणांनी केतकर यांना घरी फोन करुन ५ लाख रुपये मार्लेश्वर तिठ्यावर आणून देण्यास धमकावले. केतकर यांनी घरी मुलीला फोन केला. आपण मीटिंगमध्ये असल्याचे सांगत पाच लाख घेऊन यायला सांगितले. त्यानंतर त्यांचा मोबाइल बंद करण्यात आला.मुलीला संशय आल्याने तिने बापू शेट्ये यांना कळवून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान दुसऱ्या गाडीने रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास राजापूरच्या दिशेने जात मध्यरात्री १२:३० वाजता महामार्गावर वाटुळ पुलाखाली केतकर यांना सोडून देण्यात आले. यादरम्यान त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.केतकर महामार्गावर आल्यावर राजापूर पोलिसांची गस्तीची गाडी आली. त्या गाडीला हात दाखवून त्यांनी सगळी माहिती सांगितली. राजापूर पोलिसांनी त्यांना देवरुखला पोहोचण्यास मदत केली. ते पहाटे ३ वाजता घरी आले. त्यानंतर पहाटे देवरुख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
Ratnagiri Crime: अपहरण करुन सुवर्णकाला लुटले, १४ लाखांचा ऐवज लुबाडून वाटूळ येथे सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:35 IST