कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावरून जाताय... खड्ड्यात जाल
By Admin | Updated: February 2, 2015 23:58 IST2015-02-02T21:43:03+5:302015-02-02T23:58:21+5:30
रस्त्यावरील फरशी पुलांचे बांधकाम करण्यासही खोदले खड्डे

कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावरून जाताय... खड्ड्यात जाल
पाटण : कोकणशी जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून कऱ्हाड-चिपळूण हा राज्यमार्ग आहे. या राज्यमार्गाची कऱ्हाड ते पोफळी दरम्यान अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यातच पाटण तालुक्याच्या हद्दीत असणारे रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या फरशी पुलांचे काम बांधकाम विभागाने सुरू केले असून, त्यासाठी जागोजागी खोल खड्डे काढले आहेत. ‘येथे खोल खड्डा आहे,’ असे फलक त्याठिकाणी लावले असले तरी सर्वच फरशी पूल एकदम बांधायचे काम हाती घेतल्यामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या वाहनांना धोकादायक झाले आहे. कऱ्हाड-चिपळूण हा राज्य मार्ग चौपदरीकरण होणार अशी चिन्हे दिसू लागली असून, त्याची सुरुवात कऱ्हाड तालुक्यातील विजयनगर ते वारुंजी विमानतळ परिसरात दिसून येते. अगोदरच या रस्त्याच्या दुतर्फा जुनी झाडे असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यातच पाटण ते कोयनानगर दरम्यानचा रस्ता खड्ड्यात गेल्याने वाहतुकीस अयोग्य झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील सर्व फरशी पुलांचे नवीन बांधकाम सुरू केल्यामुळे जेसीबीच्या साह्याने मोठमोठ्या चरी काढून खोल खड्डे काढले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी भरधाव येणारी वाहने अशा धोकादायक खड्ड्यांचा बळी ठरण्याची शक्यता आहे.
एकाच वेळी सर्व फरशी पुलांची कामे हाती घेण्याची गरज नव्हती ,अशी अपेक्षा वाहनधारक व्यक्त करत आहेत. (वार्ताहर)
काम ठप्प...!
कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावर फरशी पूल बांधण्यासाठी खड्डे काढून ठेवले आहेत. त्यावर बांधकाम करणारी यंत्रणा अत्यंत धिम्यागतीने काम करत आहे. काही ठिकाणी तर खड्डे काढून ठेवले आहेत, मात्र काम सुरू नाही.