विद्यापीठ युवा महोत्सवात ‘गोगटे-जोगळेकर’चे सुयश
By Admin | Updated: September 15, 2014 23:24 IST2014-09-15T21:57:09+5:302014-09-15T23:24:28+5:30
रौप्य पदक प्राप्त : महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथम

विद्यापीठ युवा महोत्सवात ‘गोगटे-जोगळेकर’चे सुयश
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात वाङमय विभागांतर्गत गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाने दोन पारितोषिके पटकावली आहेत. महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच वादविवाद (बी ग्रुप- इंग्रजी भाषा) या स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झाले आहे.४७व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या अंतिम स्पर्धा सध्या विद्यापीठात विद्यार्थी भवन, चर्चगेट येथे सुरु आहेत. ‘चांगले दिवस आले आहेत’ या विषयावर इंग्रजीतून चांदनी जलील हुश्ये आणि दिलकश जलील हुश्ये या भगिनींनी आपले विचार मांडले आणि रौप्यपदकाची कमाई केली. याचबरोबर वादविवाद (ए ग्रुप-मराठी भाषा) स्पर्धेत मैत्रेयी श्रीकांत बांदेकर (प्रथम वर्ष विज्ञान) आणि मेघना अशोक बेहेरे (प्रथम वर्ष वाणिय) या विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. अक्षर परमानंद पिलणकर या विद्यार्थ्याने मूर्तिकाम (क्ले मॉडेलिंग) स्पर्धेत ‘नाती’ या विषयासाठी रौप्यपदक प्राप्त केले.
मुंबई विद्यापीठासोबतच अन्य स्पर्धांमध्ये वाङमय मंडळाच्या विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे. कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती वक्तृत्त्व स्पर्धेत आणि ज्ञानसाधना वरिष्ठ महाविद्यालय, ठाणे आयोजित कै. ग. का फणसे कोकण विभागीय वक्तृत्त्व स्पर्धेत शुभम जनार्दन जाधव या व्दितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्याने अनुक्रमे तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
या स्पर्धांकरिता प्राचार्य डॉ. सुभाष देव, प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अतुल पित्रे यांचे प्रोत्साहन लाभले. प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. शिवराज गोपाळे, डॉ. यास्मिन आवटे, प्रा. मधुरा आठवले, प्रा. शिवाजी उकरंडे, प्रा. आनंद आंबेकर, प्रा. डी. आर. वालावलकर, प्रा. महेश नाईक, प्रा. श्रीवल्लभ साठे व मुस्सरत मुल्ला या माजी सहभागी विद्यार्थिनींचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन करण्यात आले. (प्रतिनिधी)
महाविद्यालयाने मिळविलेले यश कौतुकास्पद.
४७वा आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव.
मराठी मंडळातर्फे घेतला गेला कार्यक्रम.
अंतिम स्पर्धा विद्यापीठात सुरू, विद्यार्थ्यांनी मिळविले यश.