कोकण रेल्वेतून कॅन्सरग्रस्त बालकांची गोवा सहल
By Admin | Updated: November 6, 2014 21:59 IST2014-11-06T21:33:02+5:302014-11-06T21:59:51+5:30
कर्करूग्णांना दिलासा : वेदनाना दिली नवी उभारी; नवा उत्साह संचारला

कोकण रेल्वेतून कॅन्सरग्रस्त बालकांची गोवा सहल
रत्नागिरी : कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्रस्त झालेल्या व्यक्ती आयुष्यातील आनंदच घालवून बसतात. त्यांच्या जोडीला असतात त्या जीवघेण्या वेदना. पण, कॅन्सरग्रस्त बालकांनाही त्यांचे उज्ज्वल भविष्य खुणावत असते. अशा बालकांना जगण्याची नवी उमेद मिळावी, आनंद उपभोगता यावा, या उद्देशाने कोकण रेल्वेने या बालकांसाठी चार दिवसांची मुंबई - गोवा सहल आयोजित केली आहे.
कोकण रेल्वे २००७ सालापासून दरवर्षी वातानुकुलित डब्यातून या बालकांसाठी मुंबई - गोवा सहल आयोजित करत असते. प्रवासादरम्यान कोकण रेल्वेतर्फे त्यांना विविध भेटवस्तू देण्यात येतात. पण, त्याचबरोबर प्रवासादरम्यान तसेच संपूर्ण सहलभर त्यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या रक्षकांनाही विविध सुविधा पुरविते.
यावर्षीही मुंबईच्या टाटा मेमोरिअलमध्ये विविध टप्प्यांमध्ये सध्या उपचार घेत असलेल्या कॅन्सरग्रस्त बालकांसाठी कोकण रेल्वेने ५ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत सदिच्छा सहल आयोजित केली आहे. काल (दि. ५) ३८ मुले त्यांच्या काळजीवाहू आणि हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमसह मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून मंगलोर एक्सप्रेस (क्र. १२१३३) मधून ही सहल सुरू झाली आहे.
३ ते १६ वयोगटातील ही मुले कोकण रेल्वे मार्गावरील अनेक रमणीय दृश्ये पाहून हरखून जात आहेत.
त्याच्या चेहऱ्यावरून हा आनंद ओतप्रोत ओसंडत असलेला दिसून येत आहे. ही सारी बालके लवकरच या व्याधीतून मुक्त होऊन त्यांना भविष्यात आनंद मिळो, अशी प्रार्थना कोकण रेल्वे परिवारातून करण्यात येत आहे. ही मुले ८ नोव्हेंबर रोजी मुंबईला परतणार आहेत. या उपक्रमाबाबत एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळणार आहे. (प्रतिनिधी)
८ रोजी परतणार मुंबईत
कोकण रेल्वे परिवाराने दाखविलेल्या उत्साहाने कर्करूग्णांच्या जीवनात वेगळाच आनंद
३८ मुले सहभागी
वैद्यकीयसुविधा उत्तम प्रकारे असल्याची दिली माहिती
भविष्यात आनंद मिळेल