भाजीच्या दोन गाड्या मोफत देतो, पण जनतेची लूटमार थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:48+5:302021-04-25T04:31:48+5:30
चिपळूण : महर्षी आण्णासाहेब कर्वे भाजी व्यापारी संघाने प्रशासनाच्या सूचनेनुसार १७ एप्रिलपासून भाजी व्यापार पूर्णपणे बंद ठेवलेला असताना काही ...

भाजीच्या दोन गाड्या मोफत देतो, पण जनतेची लूटमार थांबवा
चिपळूण : महर्षी आण्णासाहेब कर्वे भाजी व्यापारी संघाने प्रशासनाच्या सूचनेनुसार १७ एप्रिलपासून भाजी व्यापार पूर्णपणे बंद ठेवलेला असताना काही लोक पानगल्ली, नगर परिषदेच्या भाजी मंडई आवारात तसेच खेर्डी परिसरात कोरोना काळात जनता आर्थिक संकटात सापडली असताना त्यांची अव्वाच्या सव्वा दराने भाजी विकून लूटमार करत आहेत. हे प्रशासनाला दिसत नाही का, असा सवाल उपस्थित करताना आम्ही जनतेसाठी मोफत दोन भाजीच्या गाड्या प्रशासनाच्या ताब्यात देतो. त्यांनी भाजी वितरण करावे पण जनतेची लूटमार थांबवावी, असे आवाहन चिपळूण भाजी व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष भरत गांगण, राकेश शिंदे, मारुती करंजकर, मेहबूब तांबे, दत्तू वाळुंज उपस्थित होते. गांगण यांनी सांगितले की, शहरात नियमांची पायमल्ली करत टोमॅटो ८० रुपये किलो दराने खुलेआम विकले जात आहेत. नगर परिषद आवारातच फळ विक्रेते दिवसभर दुकाने उघडी ठेवून आहेत. यावर तहसीलदार, प्रांताधिकारी यांचा वचक नाही. मात्र पोलिसांची भूमिका कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर परिषद प्रशासन काय करत आहे, गुन्हे का दाखल होत नाहीत, याबाबत नगराध्यक्षांकडे संपर्क केला असता मुख्याधिकारी आपले ऐकत नसल्याचे सांगितले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे येथील प्रशासनाकडून पालन केले जात नाही, असेही गांगण यांनी सांगितले.