शेखर निकम यांना संधी द्या

By Admin | Updated: October 6, 2015 00:30 IST2015-10-05T22:02:42+5:302015-10-06T00:30:01+5:30

कार्यकर्त्यांची मागणी : राजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

Give Shekhar Nikam an opportunity | शेखर निकम यांना संधी द्या

शेखर निकम यांना संधी द्या

राजापूर : विधानपरिषद आमदार नियुक्त करताना रत्नागिरी जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांना संधी द्यावी, अशी एकमुखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षकांकडे केली. तसेच पुढील विधानसभा निडवणुकीत अजित यशवंतराव यांना राजापुरातून उमेदवारी द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी पक्षनिरीक्षक संदेश कोंडविलकर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक कोंडविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात रविवारी पार पडली. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बापू शेट्ये, युवकचे जिल्हाध्यक्ष राजेश आंब्रे, विष्णू घोलम, माजी तालुकाध्यक्ष भरत लाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनेश जैतापकर, पंचायत समिती सदस्य कृष्णा म्हादये, भाग्यश्री लाड, संजय ओगले, प्रतीक मटकर, इब्राहीम लांजेकर आदी उपस्थित होते.
कोंडविलकर यांनी सांगितले की, भाजप हा भ्रष्टाचारी पक्ष आहे, या पक्षाने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे जनता आता पेटून उठणार असून, आपणही जनतेच्या बाजूने रस्त्यावर उतरले पाहिजे. तसेच पक्षात फूट पाडणाऱ्यांना दूर ठेवून कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.
यशवंतराव यांना विधानपरिषदेवर संधी देताना जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनाच विधानपरिषद आमदार म्हणून पक्षाने संधी द्यावी, अशी जोरदार मागणी पक्षनिरीक्षकांकडे केली. जिल्हाध्यक्षांनी जिल्ह्यात पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. पक्षही अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहिल्यास त्यांना पाठबळ मिळेल आणि संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय होईल. आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही आमदार राष्ट्रवादीचेच निवडून येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यशवंतराव म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पक्षाने कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून कार्यकर्त्यांना ताकद द्यावी, असे दिनेश जैतापकर यांनी सांगितले. पक्षाने नगरपरिषदेतील विकासकामांकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करतानाच राजापूरसाठी एक रूग्णवाहिका द्यावी, अशी मागणी संजय ओगले यांनी केली.
यावेळी दीपक गोर्ले, विश्वनाथ पाटकर, भरत लाड, जयप्रकाश नार्वेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतामधून पुढील विधानपरिषद निवडणुकीत अजित यशवंतराव यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश दळवी यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Give Shekhar Nikam an opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.