कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाला गती मिळावी !

By Admin | Updated: December 1, 2015 00:11 IST2015-11-30T22:59:06+5:302015-12-01T00:11:23+5:30

नाना खामकर, प्रशांत यादव यांची मागणी

Get speed on the Karhad-Chiplun railway route! | कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाला गती मिळावी !

कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाला गती मिळावी !

कऱ्हाड : ‘बारामती लोहमार्गाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातल्यामुळे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे कऱ्हाड-चिपळूण लोहमार्गाच्या कामात लक्ष घातल्यास या कामाला गती मिळेल,’ अशी मागणी येथील नाना खामकर व प्रशांत यादव यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना केली. पश्चिम महाराष्ट्र व कोकणच्या विकासासाठी कऱ्हाड-चिपळूण लोहमार्ग हा महत्त्वाचा आहे. कोकण परिसरातील बंदराद्वारे होणारी आयात निर्यात व मालवाहतूक या लोहमार्गामुळे सुलभ होणार आहे. सध्या कोकण परिसरात कोळशावर आधारित वीजप्रकल्पांना आवश्यक असणारा कोळसा परदेशातून जहाजांद्वारे आणावा लागतो. तसेच धान्य, साखर व खते आदींचीही निर्यात त्या माध्यमातून होते; परंतु लोहमार्गामुळे ही वाहतूक सुलभ होऊन रोजगारनिर्मिती होणार आहे. त्याचबरोबर मुंबई-पुण्यावरील रेल्वे वाहतुकीचा ताण कमी होण्यासही मदत होणार आहे. दक्षिण भारतातून उत्तरेकडे होणारी मालवाहतूकही सुलभ होणार आहे. हुबळीमार्गे येणाऱ्या रेल्वेगाड्या कऱ्हाड -लोणंद-फलटण-बारामती-दौंड मार्गे उत्तर भारताकडे जाऊ शकतात. याचबरोबरच पुणे-मुंबई रेल्वे मार्गामुळे लोणावळा व खंडाळ्याचा पर्यटनविकास झाला. त्याचप्रमाणे कऱ्हाड-चिपळूण लोहमार्गामुळे कोयनानगरचा विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कऱ्हाड रेल्वेस्थानकाला जंक्शनचा दर्जा प्राप्त होऊन येथे माल साठवण गोदाम उभे राहू शकतील.
कऱ्हाड-विजापूरचा सर्व्हे करण्याचेही रेल्वे खात्याने ठरविले असून, तशी घोषणा २०१५ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात कऱ्हाड-विजापूर रेल्वेलाईनही टाकता येऊ शकेल. (प्रतिनिधी)

Web Title: Get speed on the Karhad-Chiplun railway route!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.