भाजप-राष्ट्रवादीची रत्नागिरी पालिकेत गट्टी!
By Admin | Updated: November 7, 2014 09:49 IST2014-11-07T00:14:08+5:302014-11-07T09:49:23+5:30
रत्नागिरी नगरपालिकेतील राजकीय समीकरणे बदलणार असून, सेना-भाजप युती संपुष्टात येऊन भाजपा - राष्ट्रवादी असे नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.

भाजप-राष्ट्रवादीची रत्नागिरी पालिकेत गट्टी!
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेतील राजकीय समीकरणे बदलणार असून, सेना-भाजप युती संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मंगळवारी (दि. ११) होणाऱ्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची राष्ट्रवादीशी आघाडी करण्याची बोलणी सुरू असून, याला राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाप्रमाणेच उपनगराध्यक्षपदही भाजपकडेच राहण्याची शक्यता निर्माण झाली.
रत्नागिरी पालिकेत भाजपचे आठ, राष्ट्रवादीचे सहा, कॉँग्रेसचा एक, शिवसेनेचे १३ असे पक्षीय बलाबल आहे. अडीच वर्षांपूर्वी सेना-भाजप युतीने रत्नागिरीत राष्ट्रवादीची पालिकेतील सत्ता उलथवून पालिकेवर वर्चस्व मिळविले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठवित सेना-भाजप युतीने सत्ता परिवर्तन घडवून आणले होते. युतीला २१ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपद आपसात प्रत्येकी सव्वा वर्षासाठी वाटून घ्यायचे ठरविण्यात आले. पहिल्या सव्वा वर्षात नगराध्यक्षपद सेनेचे मिलिंद कीर यांना मिळाले, तर भाजपचे महेंद्र मयेकर यांना उपनगराध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर भाजपचे अशोक मयेकर पुढील सव्वा वर्षासाठी नगराध्यक्ष झाले. त्यावेळी उपाध्यक्षपद सेनेचे राहुल पंडित यांना देण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे बाळ माने हे रत्नागिरीचे उमेदवार असल्याने भाजपने अध्यक्षपदासाठी तीन महिन्यांची वाढीव मुदत मागितली. त्याला सेनेकडून मान्यता मिळाली. मात्र, त्यावेळी भाजपांतर्गत मोठे राजकारण घडले. महेंद्र मयेकर यांनी वेगळा गट स्थापन केल्याने अखेर बाळ माने यांनी अशोक मयेकर यांना थांबवत नगराध्यक्षपदाची माळ महेंद्र मयेकर यांच्या गळ्यात घालण्यास मान्यता दिली. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने सेना-भाजपचे सूर अद्यापही न जुळल्याने या संधीचा फायदा घेत भाजपचे महेंद्र मयेकर यांनी नगराध्यक्षपद सोडणार नसल्याचे जाहीर करून टाकले. मयेकर यांनी अध्यक्षपद सोडावे, यासाठी सेनेने प्रयत्न केला. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मयेकर यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठीही सेनेकडील सदस्यसंख्या अपुरी आहे.
भाजपकडील नगराध्यक्षपद टिकविण्यासाठी आघाडी करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीपुढे ठेवला आहे. त्याबाबत बोलणी झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मंगळवारी उपाध्यक्षपदाची निवडणूक होत असली तरी आघाडी करण्यामागे आम्हाला उपाध्यक्षपद हवे, असा अर्थ नाही. भाजपकडेच अध्यक्षपदाप्रमाणे उपाध्यक्षपद राहणार आहे. राष्ट्रवादी केवळ सत्तेत सहभागी होणार आहे, असे सुदेश मयेकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
सेनेच्या गोटात सन्नाटा
भाजपने फेकलेला राजकीय फासा उलटविण्यासाठी शिवसेनेत जोरदार हालचाली सुरू आहेत. कॉँग्रेसचे नगरसेवक कोणाबरोबर राहणार, राष्ट्रवादीतील काही नाराज सदस्यांचा गट पक्षाबाहेर पडणार का, अशी चर्चाही सुरू आहे. याआधी उपनगराध्यक्ष असलेले राहुल पंडित यांनी सव्वा वर्षानंतर राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेतर्फे उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवार कोण असाही सवाल निर्माण झाला असून, वरिष्ठ देतील तो उमेदवार असेल, असे सांगण्यात येते.
सेना-भाजप आमने-सामने
अडीच वर्षांपूर्वी युती करून निवडणूक लढलेले सेना-भाजप आता मात्र उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. त्यामुळे भाजपने फेकलेला हा राजकीय फासा टिकणार की, सेना आपल्याच उमेदवाराला निवडून आणून राजकीय चमत्कार करणार, याबाबत आता रत्नागिरीकरांना उत्कंठा आहे.
राष्ट्रवादी ‘व्हीप’ बजावणार
भाजपबरोबर आघाडीचा आलेला प्रस्ताव आम्ही स्वीकारणार असून, उपनगराध्यक्षपद निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान करण्यासाठी पक्षादेश (व्हीप) बजावला जाणार आहे, अशी माहिती पक्षप्रतोद मयेकर यांनी दिली.