रेल्वे स्थानकावर ‘गढुळाचे पाणी’!
By Admin | Updated: July 18, 2016 00:02 IST2016-07-17T23:57:02+5:302016-07-18T00:02:45+5:30
रत्नागिरीतील प्रकार : प्रवाशांच्या आरोग्याला धोका

रेल्वे स्थानकावर ‘गढुळाचे पाणी’!
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावरील १५ ते २० पिण्याच्या पाणी कट्ट्यांवरील नळांना तसेच चार कुलरनाही गेल्या चार ते पाच दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, याकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे व हे ‘गढुळाचे पाणी’ देण्याऐवजी प्रवाशांना चांगले स्वच्छ पाणी या नळाद्वारे पुरवावे, अशी मागणी होत आहे.
सरकता जिना, ट्रॅव्हलेटरसारख्या चांगल्या सुविधा रत्नागिरी स्थानकात कोकण रेल्वेने दिल्या आहेत. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने अनेक स्थानकेही कोकण रेल्वे मार्गावर उभारली जात आहेत. प्रवाशांना प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पिण्याचे पाणी ही चांगली सुविधा कोकण रेल्वेने निर्माण केली आहे. त्याचा लाभ स्थानिक तसेच गाड्यांमधून प्रवास करणारे असंख्य प्रवासी घेत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी रेल्वे स्थानकातील पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या सर्वच नळांना येणारे पाणी हे गढूळ आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला हे पाणी अपायकारक ठरू शकते. असे असतानाही ही व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून चांगले पाणी देण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. गढूळ पाण्यामुळे प्रवाशांना मिनरल वॉटर विकत घ्यावे लागत आहे. पिण्याचे पाणी येणाऱ्या नळांमधून गढूळ पाणी नेमके कोणत्या कारणाने येत आहे, पाण्याचे शुध्दिकरण होत नाही का, याला कोेण जबाबदार आहे व जबाबदार व्यक्तींवर काय कारवाई होणार? असे सवाल प्रवाशांमधून केले जात आहेत.
अन्य रेल्वे स्थानकांवरही अशी स्थिती तर नाही, याचीही पाहणी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)