गणपती बाप्पा मोरया...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST2021-09-13T04:29:52+5:302021-09-13T04:29:52+5:30

आबालवृद्धांचा लाडका असलेल्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणी माणूस कसलीच कसर ठेवीत नाही. घराची साफसफाई, रंगकाम, विविध गोडधोड पदार्थ, अगरबत्ती, धूप, ...

Ganpati Bappa Morya ...! | गणपती बाप्पा मोरया...!

गणपती बाप्पा मोरया...!

आबालवृद्धांचा लाडका असलेल्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणी माणूस कसलीच कसर ठेवीत नाही. घराची साफसफाई, रंगकाम, विविध गोडधोड पदार्थ, अगरबत्ती, धूप, कापूर व जिन्नसांनी कोकणी माणसाचे घर या गणेशोत्सवकाळात भरलेले असते. दैनंदिन जीवनातील ताण तणाव, व्याप, दगदग गणेशोत्सवकाळात तो विसरून जातो. आम्ही पूर्वी नागपंचमीदिवशी गणपतीचा पाट गावातल्या बाबल्याच्या गणपती शाळेत देऊन यायचो. पाट देताना बाबा सोबत नेलेले गणपतीचे कॅलेंडर बाबल्याला दाखवून सांगायचा, ‘यंदा असो गणपती घाल. पोरांची हौस हा!’ बाबल्या आमच्या बालपणापूर्वीही अनेक वर्षांपासून गणपती करायचा. साच्यातल्या गणपतीपेक्षा हाती गणपती घडवण्यात त्याचा हातखंडा होता. शाळेत जाताना दररोजच आम्ही मुले बाबल्याच्या गणपती शाळेत जाऊन ‘आमचो गणपती कितपत झालोहा’ ते बघायला जात असू. गावातल्या इतरांपेक्षा आमचा गणपती मोठा असायला हवा, असे आम्हाला दरवर्षी वाटायचे. पण त्या काळात बाबाची कमाई जेमतेम असल्याने ती इच्छा कधी पूर्ण झाली नाही. आम्ही कधी नाराज झालो तर बाबा सांगायचा, एकाच वरसां चढाओढ करून उपयोग नाय. एकदा मोठो गणपती आणलो तर प्रत्येक वरसां तसोच मोठो गणपती आणूक लागात. तेवढा आपल्या दाढेखाली मांस नाय. त्यामुळे आमचा गणपती बऱ्याचदा गाय गणपती, सिंह गणपती, फेटेवाला गणपती, मंचकावरील गणपती अशा रुपांत असायचा.

बाबल्या शाडू मातीपासूनच गणपती बनवित असे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या माध्यमाचा तो जमानाही नव्हता. बाबल्याच्या घरातली पडवी, वळय, आतली खोली शेकडो गणेशमूर्तींनी भरून जात असे. बाबल्या साधाभोळा असला तरी त्याची बायको खूप रागीट होती. आम्ही मधून चालताना एखाद्याचा गणेशमूर्तीस धक्का लागेल या भीतीने ती आम्हां पोरांना डोळे वटारीत पिटाळून लावायची. गणपतीचा बराचसा खर्च हा मुंबईतील चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर अवलंबून असायचा. त्या काळात उंची अगरबत्तीचा दरवळ जाणवला की कोणीही ओळखे, ‘चाकरमानी इले आसतले’ मसाला अगरबत्ती, सफरचंद, मोसंबीसारखी फळे, आरती व भजन संपले की फटाक्यांच्या माळा अशा सुखद गोष्टी पूर्वी लाडक्या बाप्पाला चाकरमानी उतरलेल्या घराशिवाय लाभत नसत. भजनांचा जोरही अशाच घरांमध्ये जास्त असायचा. दररोजच्या भजनातही अशा घरातल्या गणपतीसमोर एखादी गौळण वा अभंग जादाचा घेतला जायचा. पूर्वी गणपतीसमोर भजन झाले की भजन मंडळीस बेसन किंवा रव्याच्या करंज्या, रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, मूगाचे लाडू यांपैकी काहीतरी एक आणि चहा असा फराळ असे. गोरगरीब माणसांच्या घरात दुकानातून आणलेले कडक बुंदीचे लाडू असत. कडक बुंदीचे लाडू खाताना काहीजण नाक मुरडत. आता या सर्व पदार्थांची जागा खमंग मिसळ, उसळ, पाव, पूरी यांसारख्या पदार्थांनी घेतली आहे. आमच्या गावात फक्त सावंत मास्तर आणि सकपाळांच्या घरात दरवर्षी उभी पाच सहा फूट उंचीची गणेशमूर्ती असे. सावंत मास्तर दरवर्षी निराळा देखावा तयार करायचे. त्या पौराणिक प्रसंगांतील देखाव्यातल्या माणसांच्या व देवांच्या मूर्ती अगदी हुबेहुब जिवंत असल्यासारख्या दिसत. सध्याच्या गणेशोत्सवाचे स्वरुप पूर्वीपेक्षा आमूलाग्र बदलले असले तरी कोकणी माणसाची गणपती प्रती असलेली अपार श्रद्धा व भक्ती तसूभरही कमी झाली नाही हेही महत्त्वाचे आहे. आजही प्रत्येक कोकणी माणूस आपल्या ऐपतीनुसार गणेशोत्सव साजरा करतोच, किंबहुना लाडक्या गणरायाला निरोप देताना दरवेळेस गहिवरतो आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ चे साकडे घालीत पुढच्या वर्षीच्या गणपती बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसतो.

- बाबू घाडीगांवकर, जालगाव, दापोली.

Web Title: Ganpati Bappa Morya ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.