संयमाचा गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST2021-09-15T04:37:29+5:302021-09-15T04:37:29+5:30
गेल्यावर्षापासून कोरोनाचे संकट अवघ्या जगावर आहे. त्यामुळे गेल्यावर्षीही गणेशभक्तांना आपल्या आवडत्या बाप्पाचा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा लागला होता. ...

संयमाचा गणेशोत्सव
गेल्यावर्षापासून कोरोनाचे संकट अवघ्या जगावर आहे. त्यामुळे गेल्यावर्षीही गणेशभक्तांना आपल्या आवडत्या बाप्पाचा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा लागला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला होता. साधारणत: जानेवारी - फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची रुग्ण संख्या घटलेली होती. मात्र, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होळीला सुरुवात झाली. हाेळीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने आपल्या गावी आले. त्यामुळे कोरोनाचा हाॅट-स्पाॅट असलेल्या मुंबईतून चाकरमान्यांच्या आगमनाने कोरोनाचा शिरकाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे या वर्षभरात कोरोनाचे रुग्ण भरमसाट वाढले आहेत. गेल्या आठ - नऊ महिन्यांची आकडेवारी काढली तर गेल्यावर्षीपेक्षा सुमारे ५० हजाराने रुग्ण वाढले आणि मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली.
गेल्या पावणेदोन वर्षांपासून जिल्ह्याचा आरोग्य विभाग अथक दिवसरात्र काम करीत आहे. आता ही यंत्रणा खरंतर थकलेली आहे. पोलीस कर्मचारीही नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, यासाठी रस्त्यावर ऊन - पावसात काम करीत आहेत. या कोरोना योद्धयांना कोरोनाकाळात लढावे लागले, पण आताही त्यांचा लढा सुरूच आहे.
पहिल्या लाटेत होती, तशी कोरोनाची भीती आता नागरिकांमध्ये राहिलेली नाही. मात्र, ज्यांनी दुसऱ्या लाटेत रुग्णांची भरमसाट वाढलेली संख्या आणि त्यात गमावलेले आपले आप्त यांचे दु:ख अनुभवले आहे, त्यांना कोरोना संकट काय आहे, याचा चांगलाच प्रत्यय येत आहे. त्यामुळे कोरोना लवकरात लवकर या जगातूनच हद्दपार कर, असे आर्जव सारेच भक्त विघ्नहर्त्याकडे करीत आहेत.
कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असला तरी गेल्या गणेशोत्सवानंतर कोरोनाची भरमसाट वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेऊन यावेळी या काळात संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना करतानाच नागरिकांनाही या काळात कोरोनांच्या नियमांचे पालन करून सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला मुंबईहून येणाऱ्या तसेच स्थानिक नागरिकांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य केले. त्यामुळेच सर्वत्र गणेशोत्सव योग्य खबरदारी घेत, कोरोनाच्या नियमांचे पालन करून साजरा होताना दिसला. गणेशभक्तांनी दाखविलेल्या या संयत भक्तीमुळे यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने पण खऱ्या भक्तिभावाने साजरा होताना दिसत आहे.
कोरोनामुळे यावर्षीही कुठलेच कार्यक्रम, उपक्रम यांचे आयोजन झालेले नाही. त्यामुळे खरंतर गणेशभक्त आणि मंडळे नाराज आहेत, पण मुळातच काेकणी माणसाकडे असलेला संयमीपणा यावेळच्या उत्सवावेळी दिसला आहे.