गणेश मूर्तीशाळेत लगबग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:37 IST2021-09-04T04:37:34+5:302021-09-04T04:37:34+5:30
रत्नागिरी : कोरोनाचे सावट असले तरी गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी अवघे भक्तगण आतूर झाले आहेत. गणेशाच्या आगमनाला पाच-सहा दिवसांची ...

गणेश मूर्तीशाळेत लगबग सुरू
रत्नागिरी : कोरोनाचे सावट असले तरी गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी अवघे भक्तगण आतूर झाले आहेत. गणेशाच्या आगमनाला पाच-सहा दिवसांची प्रतीक्षा असली तरी लाडक्या बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. गणेशमूर्तींचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी गणेश चित्रशाळांतील लगबग वाढली आहे.
घरगुती गणेशोत्सवापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आता सरसावले आहेत. घरोघरीसुध्दा गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. साफसफाई, रंगरंगोटी, मखरांची तयारी सुरू आहे. बाजारात कोल्हापूर, पेण येथून तयार गणेशमूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. अगदी पाच इंचापासून ते अडीच फुटापर्यंत मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गणेश मूर्तीशाळेतील मूर्तिकारांची सर्वाधिक घाई सध्या सुरू आहे. गणेशमूर्तीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी रात्रपाळी करण्यात येत आहे. गावांमध्ये अद्याप पाट नेऊन द्यायची पध्दत आहे. रेडिमेडच्या दुनियेत तयार गणेशमूर्तींना वाढती मागणी आहे. पाचशे रूपयांपासून पाच हजारांपर्यंत मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इंधनाच्या दरातील वाढ शिवाय माती, रंगाच्या दरात वाढ झाली आहे. मजुरीही वाढली असल्याने मूर्तीच्या किमतीत वाढ झाली आहे.
कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश मूर्तीशाळेतही एकाच दिवशी भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी गणेशमूर्ती दोन ते तीन दिवस आधीच नेण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी प्रत्येकाला वेळही ठरवून देण्यात आली आहे. कारखान्यात मूर्ती नेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्क सक्तीचा करण्यात आला असून, सॅनिटायझरचा वापरही केला जात आहे.
------------------------------
लॉकडाऊनमुळे राज्यांतर्गत वाहतूक बंदी असल्याने मूर्ती तयार करण्यासाठी मातीची उपलब्धता उशिरा झाल्याने प्रत्यक्ष कामाला उशीर झाला. सोशल डिस्टन्सिंग राखत कामाची पूर्तता सर्वत्र युध्दपातळीवर सुरू आहे. मूर्ती नेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची एकाचवेळी गर्दी होऊ नये यासाठी भाविकांना वेळ ठरवून देण्यात आली आहे. कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करण्यात येत आहे.
- सुशांत गांगण, मूर्तिकार, नेवरे