तंटामुक्त समित्यांमुळेच गणेशोत्सव शांततेत!

By Admin | Updated: September 23, 2014 00:17 IST2014-09-22T22:33:58+5:302014-09-23T00:17:45+5:30

तंटामुक्त समिती : आता नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन

Ganatotsav is calm due to non-communicative committees! | तंटामुक्त समित्यांमुळेच गणेशोत्सव शांततेत!

तंटामुक्त समित्यांमुळेच गणेशोत्सव शांततेत!

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणपती विसर्जनाच्या मिरवणुका थाटामाटात काढण्यात आल्या. या मिरवणुका शांततेत पार पाडल्या जाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तंटामुक्त समित्यांचा सहभाग दिसून आला. नवरात्रोत्सव शांततेत साजरा होण्यासाठी तंटामुक्त समित्या झटत आहेत.
जिल्हाभरात १ लाख ५९ हजार ४३६ घरगुती, तर १०८ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाबरोबर पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस, अकरा व एकवीस दिवसांचे गणपती विसर्जन करण्यात आले. घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींच्या मिरवणुका निघत असल्यामुळे रस्त्यावर गर्दी होते. शिवाय विसर्जन घाटावरही गर्दी उसळते. भाविकांमध्ये उत्साह व जल्लोष अधिक असल्यामुळे काहीवेळा बाचाबाची किंवा तंटे उद्भवण्याची शक्यता असते. किंबहुना त्यामुळे आनंदाचे वातावरण गढूळ होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी तंटामुक्त समित्यांच्या बैठका होऊन मिरवणुका शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात सर्वत्र या मिरवणुका शांततेत पार पडल्या.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुका मोठ्या असतात. त्या तुलनेत घरगुती गणपतींच्या मिरवणुका लहान असतात. ग्रामीण भागात वाडीतील गणेशमूर्ती एकत्रित मिरवणुकीने नेण्यात येत असल्यामुळे बहुधा या मिरवणुका मोठ्या असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा एकापेक्षा अधिक मिरवणुका एकत्र येतात. अशावेळी किरकोळ कारणातून तंटे उदभवू शकतात. मात्र, हे तंटे टाळण्याची जबाबदारी तंटामुक्त समितीची होती. त्यानुसार समितीचे पदाधिकारीदेखील मिरवणुकीच्या वेळी उपस्थित होते.
आता नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असल्याने गणेशोत्सवाबरोबर नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तंटामुक्त समित्यांव्दारे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात दि. २५ रोजी दुर्गा मातेच्या एकूण ३६४ मूर्तींची प्र्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ७४ ठिकाणी दुर्गामाता फोटो पूजन होणार आहे. ९४ ठिकाणी दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत नवरात्रोत्सव आल्याने उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तंटामुक्त समित्या सूचना करीत आहेत. तंटे उदभवू नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाबरोबर तंटामुक्त समित्याही सज्ज झाल्या आहेत.

गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी वेळोवेळी बैठका घेवून ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले होते. त्यास यश आले असून कोठेही तंटा किंवा भांडण न उदभवता उत्साहात व शांततेत मिरवणूका पार पडल्या. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याच्या सूचना ग्रामस्थांना करण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेण्यात आल्या आहेत. दूर्गामातेच्या आगमनाबरोबर विसर्जन मिरवणूका तसेच नवरात्रातील दांडिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार तंटामुक्त समित्या सज्ज झाल्या आहेत.
-विठोबा पाटील, अध्यक्ष तंटामुक्त समिती, मिरजोळे.

Web Title: Ganatotsav is calm due to non-communicative committees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.