गणपतीपुळेत भाविक, पर्यटकांचा सागर
By Admin | Updated: May 24, 2016 00:49 IST2016-05-23T23:27:11+5:302016-05-24T00:49:44+5:30
हॉटेल्स, लॉज हाऊसफुल्ल : पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात
गणपतीपुळेत भाविक, पर्यटकांचा सागर
गणपतीपुळे : गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात हंगामी सुटीच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मात्र, येथील सुर्वे स्टॉप, कोल्हटकर तिठा आदी ठिकाणी दिवसातून अनेकवेळा वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होते.
वाहतुकीची कोंडी होत असतानाच त्यावर येथील स्थानिक पोलीस तसेच पोलीस मुख्यालयातून बंदोबस्तासाठी आलेले पोलीस योग्य रितीने वाहतूक हाताळताना दिसत आहेत. ग्रामपंचातीकडून सागरदर्शन पार्किंग येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. लक्झरी, टेम्पो ट्रॅव्हलर, सुमो, एस. टी. बसेस, ट्रक व इतर चार चाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आपटा तिठा ते मोरया चौक या रस्त्यावर एका बाजूला पार्किंग करण्यात आले असून, मोरया चौक ते कोल्हटकर तिठा या रस्त्यावरही रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग करण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे सुरक्षारक्षक मेहनत घेत आहेत.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात गर्दीच्या वेळी येथील जयगड पोलीस स्थानकातून बंदोबस्त मागवला जातो. यावेळी सुमारे १० ते १५ पोलीस कर्मचारीही दिले जातात. सध्या कार्यरत असलेले पोलीस कर्मचारीही मोठी मेहनत घेऊन गर्दीवर नियंत्रण मिळवताना दिसतात. मात्र, गर्दीच्या वेळी सुमारे चार वाहतूक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी दिल्यास वाहतूक व्यवस्था आणखी सुरळीत होईल, असे बोलले जात आहे.
गणपतीपुळे संस्थानकडून कायमस्वरुपी दर्शनलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या दर्शनलाईनमधून योग्य पद्धतीने भाविक दर्शन घेताना दिसून येत आहे. रांगेतून योग्य पद्धतीने दर्शन घेता येत असल्यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे. समुद्रचौपाटीवर समुद्राच्या पाण्यात अपघात होऊ नये, यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून, टेहळणी मनोऱ्यावरुन लक्षही ठेवण्यात येत आहे.
दि. १ ते १९ मे या कालावधीत येथे फारशी गर्दी दिसून येत नव्हती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून अचानक गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. गेले तीन दिवस गणपतीपुळे परिसरातले सर्व लॉज फुल्ल झाल्याचे दिसून येते. काही ठिकाणी खोल्या शिल्लक नाहीत, अशा प्रकारचे बोर्ड लागल्याचे दिसून येत आहे. वाढणारा उष्मा यामुळे सध्या लिंबू सरबत, कोकम सरबत, कैरी पन्हे आदी थंड सरबतांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)