गणपतीपुळेत तोतया दिग्दर्शकाला अटक
By Admin | Updated: April 29, 2016 00:21 IST2016-04-28T23:35:36+5:302016-04-29T00:21:31+5:30
गोव्यातील फरार आरोपी : फसवणुकीचा आकडा लाखोंवर जाण्याची शक्यता

गणपतीपुळेत तोतया दिग्दर्शकाला अटक
रत्नागिरी / गणपतीपुळे : मुलाला अॅग्रो प्रॉडक्टची जाहिरात देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या तोतया दिग्दर्शक संदीप पाटील याला गणपतीपुळे येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, हा संशयित वेगवेगळ्या नावाने लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.
उदय गोविंद सावंत (मुंबई गोरेगाव) यांची संदीप पाटील याच्याशी ओळख व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून झाली. त्यामुळे संदीप हा एक आठवड्यापासून त्यांच्या संपर्कात होता. संदीप पाटील ऊर्फ सँडी याने तुमच्या १० वर्षाच्या मुलाला जाहिरातीत काम देतो. त्यासाठी दहा हजार रुपये द्या, असे सांगून सावंत यांना रत्नागिरी येथे बोलावून घेतले. त्यानुसार ते बुधवारी रत्नागिरीत दाखल झाले.
संदीप पाटील याने सावंत यांना आणण्यासाठी आपली इनोव्हा गाडी (एमएच-०६-५३९८) पाठविली.
(पान १ वरून) दरम्यान, आपला मुलगा सोहम सावंत याला घेऊन ते कोहिनूर हॉटेल येथे गेले. तेथे संदीप याला त्यांनी १० हजार रुपये दिले. त्यावेळी संदीप याने सोहम याचे फोटोशूट करून शुटिंगला २८ एप्रिलपासून सुरुवात करू, असे सांगून त्यांची पाठवणी केली. मात्र, तसे काही झाले नाही. उलट कोहिनूर हॉटेलचे पैसे देखील त्याने बुडविले. याबाबत तत्काळ शहर पोलिस स्थानकांत तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी संदीपविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरीत उदय सावंत यांची फसवणूक करून संशयित संदीप याने थेट गणपतीपुळे येथे संदीप व्हरांबळे या नावाने अभिषेक हॉटेल गाठले. तेथे आपल्याला २० रूम पाहिजे असल्याचे त्याने व्यवस्थापकाला सांगितले; परंतु त्याच्याकडे कोणतेही साहित्य नसल्याने तेथील व्यवस्थापकाला त्याचा संशय आला. त्यांनी त्याचे ओळखपत्र पाहून त्याबाबत इंटरनेटवर माहिती घेतली. त्यावेळी तो गोव्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
आपल्याबाबत व्यवस्थापकाला माहिती कळल्याचे लक्षात येताच संदीपने जंगलात पोबारा केला; परंतु पोलिसांनी त्याला काही तासातच जेरबंद केले.
संदीप पाटील हा गेल्या वीस दिवसांपासून कोहिनूर येथे वास्तव्यास होता. याठिकाणी तो नवनवीन मुली हॉटेलमध्ये आणायचा, अशी चर्चा गणपतीपुळे परिसरात सुरू आहे. याबाबत संदीप पाटील उर्फ सँडी ऊर्फ संदीप व्हरांबळे असे नाव सांगणाऱ्या या तोतया फिल्म डायरेक्टरच्या विरोधात शहर पोलिस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
मुलींचे अनेक फोटो
संदीप पाटील याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो असून तो या मुलीचा अनैतिक धंद्यासाठी वापर करीत असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या गाठोड्यात महिलाचे ड्रेस, कंडोम आदी सहित्य सापडले असून यावरून तो अश्लील कारनामे करत असल्याची चर्चा गणपतीपुळ्यात चालू आहे.