गणपती आणि पीर नांदतात एकाच घराच्या छताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:06 PM2019-09-09T12:06:32+5:302019-09-09T12:08:34+5:30

रत्नागिरी तालुक्यातील जयगड गावातील विकास वामन परकर यांच्या घरासमोरील अंगणवजा सभागृहात वागळे पीर बाबांची कबर आहे. परकर कुटुंबीय गणेशोत्सव उत्साहाने साजरा करतात. सध्या त्यांच्या घरात गणपत्तीबाप्पा विराजमान झाला आहे, त्यामुळे सर्वधर्मसमभावनेचा हा अनोखा उत्सव परकर कुटुंबीय गेल्या चार पिढ्यांपासून भक्तीभावाने साजरा करीत आहेत.

Ganapati and Pir are under the roof of one house | गणपती आणि पीर नांदतात एकाच घराच्या छताखाली

गणपती आणि पीर नांदतात एकाच घराच्या छताखाली

Next
ठळक मुद्देगणपती आणि पीर नांदतात एकाच घराच्या छताखालीसर्वधर्मसमभावनेचा अनोखा उत्सव चार पिढ्यांपासून

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड गावातील विकास वामन परकर यांच्या घरासमोरील अंगणवजा सभागृहात वागळे पीर बाबांची कबर आहे. परकर कुटुंबीय गणेशोत्सव उत्साहाने साजरा करतात. सध्या त्यांच्या घरात गणपत्तीबाप्पा विराजमान झाला आहे, त्यामुळे सर्वधर्मसमभावनेचा हा अनोखा उत्सव पारकर कुटुंबीय गेल्या चार पिढ्यांपासून भक्तीभावाने साजरा करीत आहेत.

जयगड गावातील पेठवाडी येथे विकास परकर यांचे पिढीजात घर आहे़ त्यांच्या पणजोबांपासून घराच्या आवारात छोटीशी कबर (थडगे) होती. घर दुरूस्तीवेळी ती कबर काढण्याचे त्यांनी निश्चित केले. मात्र, त्यांची आत्या जनाबाई पारकर यांना त्याच रात्री दृष्टांत झाला की, माझी मोडतोड करू नका, मी तुमच्या सहाय्याला आहे, त्यामुळे कबर न हटवता, घर दुरूस्तीनंतर घराच्या दारात सभामंडप घालण्यात आला. त्याचवेळी कबरीवरही छान छत उभारून कबरीभोवती लोखंडी जाळी लावण्यात आली आहे.

पारकर कुटुंबियांची वागळे पीर बाबांवर अखंड श्रध्दा आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी अगरबत्ती लावणे, लोबान दाखवणे, दर गुरूवारी नारळ अर्पण करणे, केळी किंवा तत्सम फळांचा प्रसाद हा उपक्रम आजही सुरू आहे. हिंदू तसेच मुस्लिम बांधव श्रध्देने वागळे पीर बाबांकडे प्रार्थना करतात.

पारकर कुटुंबीय दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात़ अनंत चतुर्दशीपर्यंत त्यांचा गणपती असतो. गणपतीबाप्पांवर त्यांची अखंड श्रध्दा आहे. मात्र, दरवर्षी नैवेद्याचे पहिले पान कबरीजवळ ठेवले जाते. उत्सव कालावधीत कबरीवर विद्युत रोषणाईही केली जाते. घरात लग्नकार्य असो वा अन्य कोणताही समारंभ पहिला मानाचा नारळ वागळे पीरांना दिला जातो. घरात गणपत्ती बाप्पा विराजमान असले तरी समोर दारात वागळे पीर बाबांची कबर आहे. त्यामुळे गणपतीला नमस्कार करणारे भविक तितक्याच श्रध्देने कबरीसमोरही नतमस्तक होतात.

ईद-ए-मिलादच्या दुसऱ्या दिवशी ऊर्स साजरा करण्यात येतो. मुस्लिम बांधवांशी चर्चा करुन वागळे पीर बाबांचा ऊर्सचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. ऊर्सच्या एक दिवस आधी जयगड येथील मुस्लिम भाविक कबरीला गुस्ल अर्पण करतात. रात्री कुराण पठण, ग्यारवी शरीफ तर ऊर्सच्या दिवशी संदल, गिलाफ चादर अर्पण करण्यात येते. सर्व धार्मिक विधी मुस्लिम बांधव, मौलवी यांच्या उपस्थितीत केले जातात़ या ऊर्सचा सर्व खर्च पारकर कुटुंबीय दरवर्षी श्रध्देने करतात़ त्याचबरोबर भाविकांना प्रसादही देतात.

सर्वधर्मसमभावाची प्रचिती...

जयगड येथील विकास परकर यांच्या अंगणात वागळे पीर यांची कबर असली तरी जयगड मुस्लिम बांधवांच्या सहकार्याने याठिकाणी ऊर्स साजरा केला जातो. इतकेच नव्हे तर मुस्लिम धर्मियांच्या ईद, मोहरम सणांच्या कालावधीतसुध्दा गुलाबपाणी, अत्तरमिश्रीत गुस्ल किंवा चादर बदलण्याचा विधी पारकर मौलवींकडून करून घेतात.

जयगड गावात पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. या गावात ७० टक्के मुस्लिम बांधव राहतात. तसेच सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. ऊर्समध्ये गावातील हिंदू-मुस्लिम भाविक उत्साहाने सहभागी होत असल्याने सर्वधर्म समभाव ही परंपरा आजतागायत जपली गेली आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे गणेश दर्शनासाठी आलेला भाविक श्रध्देने वागळे पीर कबरीसमोरही नतमस्तक होतो हे विशेष!

Web Title: Ganapati and Pir are under the roof of one house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.