हॉटेलमधील चोरीप्रकरणी आरोपी मुंबईत गजाआड
By Admin | Updated: December 5, 2015 23:38 IST2015-12-05T23:33:51+5:302015-12-05T23:38:15+5:30
चिपळूणमधील घटना : १ लाख १६ हजारांची चोरी

हॉटेलमधील चोरीप्रकरणी आरोपी मुंबईत गजाआड
चिपळूण : येथील मध्यवर्ती एस्. टी. स्टॅण्ड परिसरात असलेल्या एका हॉटेल व बारमधून बुधवारी मध्यरात्रीनंतर १ लाख १६ हजारांची चोरी करणाऱ्या चोरट्याला चिपळूण पोलिसांनी घाटकोपर मुंबई येथे ताब्यात घेतले. शनिवारी त्याला अटक करण्यात आली आहे. तेथेच असलेले बँक आॅफ इंडियाचे एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न त्याने केला होता आणि सीसीटीव्हीमुळे तो गजाआड झाला. संदीप शांताराम गोमले (२३, रा. जयअंबे सोसायटी, जय मल्हारनगर, खंडोबाची टेकडी, घाटकोपर मुंबई) असे या चोरट्याचे नाव आहे.
बसस्थानक परिसरात वीरेश्वर कॉलनीलगत असलेल्या रूपाली हॉटेल व बारमधून बुधवारी मध्यरात्रीनंतर ही चोरी झाली होती. खिडकीतून आत प्रवेश करून संदीप गोमले याने हॉटेलमधील १ लाख १५ हजार रुपयांची रोकड लांबविली होती. बाहेर आल्यानंतर त्याने लगतच असलेले बँक आॅफ इंडियाचे एटीएम सेंटर फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
हॉटेलचे मालक बन्सीलाल कापडी यांनी चोरी झाल्याची तक्रार चिपळूण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांनी आपल्या हॉटेलमधील कामगार किशोर रामाणे याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार रामाणे याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, रामाणे हा चोरटा नसावा, अशी खात्री पोलिसांना असल्याने पोलिसांनी शहरातील सर्व लॉजची झाडाझडती सुरूकेली. एका लॉजमध्ये हा आरोपी असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समजले. कारण त्या लॉजमधील चोरट्याचे लायसन्सवरील छायाचित्राशी सीसीटीव्हीमधील फुटेजशी साम्य होते. शिवाय त्याच लॉजच्या खाली असलेल्या कॉईन बॉक्समधून त्याने एका स्थानिक व्यक्तीला संपर्क साधला होता.
पोलिसांनी ‘कॉल डिटेल’ मागवून खात्री केली. संबंधित व्यक्तीनेही फोटो पाहून पोलिसांना सहकार्य केले. त्यानुसार पोलिसांनी घाटकोपर मुंबई येथे जावून संदीप गोमले याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस नाईक गणेश नाले, पोलीस कॉन्स्टेबल गगनेश पटेकर, योगेश नार्वेकर, सचिन जाधव, संदीप नाईक यांनी ही कामगिरी २४ तासांच्या आत फत्ते केली.
संदीप गोमलेचे आजोळ केळणे (ता. खेड) गावी असून, त्याची मावशी धामणंद येथे राहते. संदीप हा सराईत चोरटा असावा, असे पोलिसांचे मत आहे. यापूर्वी मुंबईत प्रेम प्रकरण व मोबाईल चोरीचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. (प्रतिनिधी)