अमली पदार्थ विकणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST2021-07-01T04:22:15+5:302021-07-01T04:22:15+5:30
खेड : तालुक्यातील सुकिवली बौद्धवाडी येथे सोमवारी रात्री खेड पोलीस स्थानकाच्या पथकाने सापळा रचून गांजा विक्रीसाठी आलेल्या ...

अमली पदार्थ विकणारा गजाआड
खेड : तालुक्यातील सुकिवली बौद्धवाडी येथे सोमवारी रात्री खेड पोलीस स्थानकाच्या पथकाने सापळा रचून गांजा विक्रीसाठी आलेल्या आकाश विजय जाधव (३०, रा. सुकिवली बौद्धवाडी, ता. खेड) याला मुद्देमालासह रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकिवली बौद्धवाडी येथे धाड टाकून २२,५०० रुपये किमतीचा १ किलो ४८८ ग्रॅम वजनाचा गांजा, दुचाकी वाहन, मोबाईल, तसेच अमली पदार्थ विक्रीसाठी आवश्यक इतर साहित्य असा एकूण ९८,८४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मात्र, दुसरा संशयित अनिल शिवराम चव्हाण उर्फ अनिल बुवा (५०, रा. सुकिवली बौद्धवाडी, ता.खेड) हा पोलिसांची चाहूल लागल्याने आपली दुचाकी (एम. एच.-०८ -एडब्ल्यू-५६४५) तेथेच टाकून काळोखाचा फायदा घेऊन घनदाट जंगलामध्ये पळून गेला.
याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस शिपाई संकेत गुरव यांच्या फिर्यादीरून खेड पोलीस स्थानकात अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (एन. डी. पी. एस. कायदा) कलम ८ (क), २० (ब) (२) २२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी आकाश विजय जाधव याला अटक करण्यात आली असून, त्याचा साथीदार अनिल शिवराम चव्हाण उर्फ अनिल बुवा (५०) याचा शोध सुरू आहे. या पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस नाईक वीरेंद्र शांताराम आंबेडे, संकेत गुरव, साजिद नदाफ, अजय कडू यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे हे करीत आहेत.