गुहागरात नातूंचा पुन्हा पराभव, जाधव विजयी
By Admin | Updated: October 20, 2014 00:58 IST2014-10-19T23:08:42+5:302014-10-20T00:58:45+5:30
भाजपच्या विनय नातूंचा ३२ हजार ७६४ मतांनी पराभव

गुहागरात नातूंचा पुन्हा पराभव, जाधव विजयी
गुहागर : गुहागर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांनी भाजपच्या विनय नातूंचा ३२ हजार ७६४ मतांनी पराभव केला. माजी खासदार निलेश राणे यांनी जाधव यांच्या पराभवासाठी कंबर कसली होती. मात्र त्यानंतरही जाधव यांनी एकतर्फी विजय मिळवला.निवडणूक आयोगाच्या वेळेनुसार सकाळी ८ वाजता गुहागर रंगमंदिर येथे गुहागर मतदारसंघासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली. भास्कर जाधव यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेले मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिले. पहिल्या दोन फेऱ्यांतच प्रत्येकी एक हजारचे व चौथ्या फेरीमध्ये तब्बल तीन हजारांचे मताधिक्य घेतले. पुढे एक ते दोन हजारांचे मताधिक्य कायम राहिले. अकराव्या फेरीमध्ये भास्कर जाधव ३४ हजार ७६३ मते घेऊन तब्बल १६ हजार २०३ मतांनी आघाडीवर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून फटाक्यांच्या आतषबाजीला सुरुवात होऊन जल्लोष साजरा करण्याची सुरुवात झाली. आपल्या उमेदवाराचा पराजय निश्चित झाल्याचे स्पष्ट होताच मतमोजणी पाहणीसाठी नेमणूक केलेल्या शिवसेना तालुकाध्यक्ष महेश नाटेकर यांच्यासह शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.
गुहागर मतदारसंघासाठी एकूण १ लाख ५२ हजार ४० मतदान झाले. यामध्ये १ हजार ६१३ एवढे नोटा मतदान झाले. प्रत्येक फेरीमध्ये ५० ते १०० सरासरी नोटांचा वापर मतदारांनी केला. ६०६ एवढे पोस्टल मतदान झाले. अनेक कर्मचाऱ्यांनी मतदान फॉर्मवर ओळख न दिल्याने तब्बल ५१ मते बाद झाली. सहाव्या फेरीपर्यंत शिवसेनेचे विजयकुमार भोसले दुसऱ्या क्रमांकावर होते. यानंतर नातूंनी मिळालेले मताधिक्य कायम ठेवत दुसरा क्रमांक कायम ठेवला. १०व्या व ११व्या फेरीला मतदानयंत्रामध्ये तांत्रिक बिघाड आल्याने काहीवेळ मतमोजणी थांबवण्यात आली होती. हा बिघाड दूर केल्यानंतर पुन्हा मतमोजणी सुरळीतपणे चालू
झाली.
मतमोजणी प्रक्रिया संपल्यानंतर दुपारी ११.३० वाजता सर्व उमेदवारांची मिळालेली मते जाहीर करत भास्कर जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर भास्कर जाधव यांना निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले. (प्रतिनिधी)