शुभम सावंतवर अंत्यसंस्कार

By Admin | Updated: October 17, 2014 00:40 IST2014-10-16T23:36:40+5:302014-10-17T00:40:06+5:30

हुडहुड’ग्रस्त भागात शहीद : माजगाव लोटले अंत्ययात्रेत

Funeral for Shubham Sawant | शुभम सावंतवर अंत्यसंस्कार

शुभम सावंतवर अंत्यसंस्कार

सावंतवाडी : आंध्र प्रदेश व ओडिशाच्या किनारपट्टीवर आलेल्या ‘हुडहुड’ या चक्रीवादळामुळे विशाखापट्टणम येथे नुकसान झालेल्या भागात मदतकार्य पोहोचविताना सावंतवाडी माजगाव येथील जवान शुभम उदय सावंत (वय २२) शहीद झाला. त्यांचा मृतदेह पाच दिवसांनी आज, गुरुवारी त्यांच्या मूळगावी माजगाव येथे आणण्यात आला. यावेळी संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते. त्यांच्या आई-वडिलांसह जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळींनी शुभमचे दर्शन घेतल्यानंतर गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ‘हुडहुड’ हे ताशी १७० ते १८० किलोमीटर वेगाने चक्रीवादळ आले होते. यात विशाखापट्टणममध्ये मोठी हानी झाली. या वादळात सापडलेल्या लोकांना मदत आणि बचाव कार्यासाठी नौदलाची पथके पाठविण्यात आली होती. त्यात माजगाव येथील शुभम सावंत यांच्यासह पाचजणांचे पथकही होते. ते विशाखापट्टणम येथे कार्यरत होते.
रविवारी (११ आॅक्टोबर) सकाळच्या सुमारास नौदलाचे पथक कार्यरत असतानाच वादळामुळे पडलेली झाडे बाजूला करीत असतानाच एक झाड शुभम यांच्या अंगावर पडले. त्यात गंभीर जखमी झालेल्या शुभम यांना विशाखापट्टणम येथील एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण त्याचदिवशी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. शुभमसोबतच्या अन्य युवकांचाही यावेळी मृत्यू झाला आहे. विशाखापट्टणम येथे वादळाने सर्व दूरध्वनी व भ्रमणध्वनी यंत्रणा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे शुभम यांच्या घरच्यांना रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास याबाबत माहिती देण्यात आली.
अंत्यसंस्कारापूर्वी नौदलाच्या एका तुकडीने तसेच नंतर पोलिसांनी गोळीबाराच्या हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्ययात्रेत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, विकास सावंत, डी. जी. सावंत, सरपंच आबा सावंत, सभापती प्रमोद सावंत, तहसीलदार सतीश कदम, पोलीस निरीक्षक रणजित देसाई, दाजी वारंग, रेश्मा सावंत, अशोक दळवी, श्वेता कोरगावकर, अ‍ॅड. शाम सावंत, चंद्रकांत कासार, भाऊ सावंत, उपसरपंच अमिदी मेस्त्री, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

वीरांसाठीची स्मशानभूमी
शुभम सावंत यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी यापूर्वी सीमेवर शहीद झालेल्या दीपक सावंत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळे ही जागा वीरांसाठी असल्याचे गावकरी सांगत होते.

Web Title: Funeral for Shubham Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.