नळयोजनांना हवाय कोटीचा निधी
By Admin | Updated: January 20, 2015 00:08 IST2015-01-19T23:20:17+5:302015-01-20T00:08:45+5:30
जिल्हा परिषद : २९ गावांसाठी हवेत १ कोटी १२ लाख

नळयोजनांना हवाय कोटीचा निधी
रत्नागिरी : जिल्ह्यातील २९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी योजना नादुरुस्त झाल्या आहेत़ त्यासाठी १ कोटी १२ लाख ५० हजार रुपये खर्च करावा लागणार आहे़ बंद योजनांमुळे उन्हाळ्यामध्ये या गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे़
कोट्यवधी रुपये खर्च करुन जिल्ह्यात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत़ या योजनांमुळे अनेक गावातील हजारो लोकांच्या घरापर्यंत पाणी नेण्यात यश आले होते़ त्याचा फायदा उन्हाळ्याच्या दिवसांत उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या कालावधीत मोठा होतो़ जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही पाणी साठविण्याचे नियोजन नसल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शिवसेना - भाजपाच्या युतीच्या कालावधीत जिल्ह्यात अनेक गावांमध्ये नळपाणी योजना राबवण्यात आल्या होत्या. या योजनामुळे डोंगराळ भागातील गावातील वाड्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यश आले होते़ मात्र, त्या योजनांची वेळीच डागडुजी व दुरुस्ती करण्यात न आल्याने त्याचा फटका आता लोकांना बसत आहे़या योजनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्या नादुरुस्त झाल्या असल्याने आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते़ त्यासाठी नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती होणे आवश्यक आहे़ नादुरुस्त योजनांमुळे २९ गावांतील हजारो लोकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. जिल्ह्यातील २९ गावांना पाणी पुरवठा करण्याऱ्या नळपाणी योजना नादुरुस्त झाल्या आहेत़ या योजनांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी १२ लाख ५० हजार रुपये खर्च करावा लागणार आहे़ त्याबाबतचा प्रस्तावही जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे़ तो लवकरच जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे़ (शहर वार्ताहर)