रत्नागिरी : राज्यात रत्नागिरी जिल्हा विकासात अग्रेसर रहावा, यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील विविध गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरी शहरातील भाट्ये येथील बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी बांधकाम सभापती महेश म्हाप, सरपंच प्रीती भाटकर, सुरेंद्र भाटकर, दिलीप भाटकर, विवेक सुर्वे, नंदा मुरकर, तुषार साळवी, पराग भाटकर उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, या बहुउद्देशीय सभागृहाचा फायदा गावातील बचत गट तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी होईल. गावातील बचत गट जी उत्पादने तयार करतील, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली आहे. भाट्ये गावाच्या विकासासाठी सुमारे ४ कोटी ९० लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.भाट्येनंतर त्यांनी फणसोप येथेही विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, गावामध्ये विकास कामे करताना राजकीय मतभेद दूर ठेवावेत. या गावासाठी नळपाणी योजना, रस्ते, स्मशानभूमी, साकव या कामांसाठी सुमारे दहा कोटींचा निधी मंजूर केल्याचे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.मंत्री सामंत यांनी भाट्ये, फणसोप, कोळंबे या ठिकाणच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन केले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांची उपस्थिती हाेती.
ग्राम विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, पालकमंत्री उदय सामंतांची ग्वाही
By मनोज मुळ्ये | Updated: June 10, 2023 13:52 IST